Pune Porsche Accident: 'अजित पवारांचा फोन जप्त करा आणि..', पुण्याच्या पालकमंत्र्यांना 5 प्रश्न विचारत आरोप


Pune Porsche Accident Allegations Against Ajit Pawar: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी 19 मे रोजी कल्याणी नगरमध्ये झालेल्या भीषण अपघातानंतर पुण्याच्या पोलीस आयुक्तांना फोन केला होता का असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या असलेल्या अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे. अजित पवार यांची चौकशीची मागणी केली आहे. तसेच अजित पवार यांनी खरंच पोलीस आयुक्तांना फोन केला होता का याचा खुलासा पोलिसांनी करावा असंही दमानिया यांनी म्हटलं आहे. त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर यासंदर्भातील पोस्ट केली आहे. अजित पवार यांचा फोन जप्त करुन तपासणीसाठी पाठवण्याची मागणी अंजली दमानियांनी केली आहे. मात्र या दाव्यावर अजित पवारांनीही प्रतिक्रिया नोंदवली आहे.

माझ्या मनाताही शंका की…

अंजली दमानिया यांनी त्यांच्या एक्स (आधीचं ट्वीटर) अकाऊंटवर सोमवारी एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये अंजली दमानिया यांनी, “चार दिवसांपूर्वी मी एक पोस्ट केलं होतं. त्यामध्ये मी माझ्या काही शंका उपस्थित केल्या होत्या. या अपघातात दोन तरुणांनी प्राण गमावले. संपूर्ण पोलीस यंत्रणा एका श्रीमंत कुटुंबासाठी काम करत होती. त्यामागे कोण होतं याबद्दल मला शंका होता. शंका असल्याने मी ते ट्वीट डिलीट केलेलं. पण आज माझी ती शंका खरी ठरतेय की काय? मी आजच काही ट्वीट पाहिली. अजित पवारांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांना फोन केला असं ते ट्वीट आहे. माझ्याही मनात हीच शंका होती,” असं म्हटलं आहे.

अजित पवारांचा राजीनामा घ्या

पुढे बोलातना अंजली दमानिया यांनी, “पहिले चार दिवस एक सिंगल ओळ नाही. फार सकाळी उठून मी काम करतो म्हणणारे अजित पवार पुण्याचे पालकमंत्री एकाही शब्दाने बोलले नाहीत. प्रत्येक वेळेस त्यांच्या टिंगरेंचं नाव समोर येत होतं. यामध्ये टिंगरेंसाठी पुण्याचे पोलीस आयुक्त असं काही करु शकतील असं मला वाटत नाही. पण ही सर्व सारवासारव चालली होती ती कोणामुळे चालली होती हा पहिला प्रश्न. पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी तात्काळ यावर स्पष्टीकरण द्यावं.  अजित पवारांनी त्यांना फोन केला होता की नाही हे सांगावं. केला नसेल तर उत्तम पण केला असेल तर अजित पवारांचा राजीनामा घेतला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे राजीनामा घेतला पाहिजे. फडणवीसांनीही त्यांच्याकडे राजीनामा मागितला पाहिजे. पुणे पोलिसा आयुक्तांनी तातडीने यावर स्पष्टीकरण दिलं पाहिजे,” असं म्हणाल्या आहेत. “अजित पवार यांचा फोन ताबडतोब जप्त करा आणि तपासणी साठी पाठवा,” असं एक वेगळं ट्वीटही अंजली दमानिया यांनी केलं आहे. 

अजित पवारांना पाच प्रश्न

अजित पवारांना काही प्रश्न असं म्हणत दामनिया यांनी पाच प्रश्न अन्य एका पोस्टमध्ये विचारले आहेत. हे प्रश्न खालीलप्रमाणे :

1. पालकमंत्री म्हणून, आरोपींना शिक्षा व्हावी म्हणून तुम्ही ठिय्या देऊन सीपी ऑफिसमध्ये का नाही बसलात?

2. जेव्हा फडणवीसांनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा पुण्याचे पालकमंत्री म्हणून आणि उपमुख्यमंत्री म्हणून तुम्ही त्यांचा बाजूला का नव्हतात?

3. कुठलीही प्रतिक्रिया द्यायला 4 दिवस का लागले? ते पण पत्रकारांनी प्रश्न विचारला नंतर का बोललात?

4. घटना घडली तेव्हा तुम्ही कुठे होतात? 

5. तुमचे आणि अग्रवाल कुटुंबाचे आर्थिक संबंध होते का?

दामनिया यांनी, “शुल्लक गोष्टींवर भडकणारे अजित पवार, आज पत्रकार परिषदेत गांगरल्यासारखे का होते. जर आरोप खोटे होते तर ते भडकले कसे नाहीत? बऱ्याच गोष्टी बाहेर येतील,” असंही म्हटलं आहे.

अजित पवार काय म्हणाले?

अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांनंतर अजित पवार यांना सोमवारी सायंकाळी एका पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी, “आपण अशाप्रकारे कोणालाही फोन केलेला नाही,” असं उत्तर दिलं. 





Source link

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *