
Raj Thackeray on BMC Election: आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीसह महापालिका निवडणुकीसाठी सुद्धा महायुतीसह महाविकास आघाडीकडून सुद्धा जय्यत तयारी सुरू आहे. महायुतीत एकमेकांचे नाराज नेते खेचण्याची सुद्धा स्पर्धा लागली आहे. मात्र हे सर्व होत असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन बंधू तब्बल वीस वर्षांनी एकत्र आल्याने त्यांचीही युती होणार का? या संदर्भात चर्चा सुरू असतानाच आज (4 ऑगस्ट) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये बोलताना सूचक वक्तव्य करत कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला.
तर तुम्ही तुमच्यामध्ये हेवेदावे कशासाठी ठेवता?
आज पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये बोलताना राज ठाकरे यांनी 20 वर्षांनी दोन भाऊ आम्ही एकत्र येऊ शकतो, तर तुम्ही तुमच्यामध्ये हेवेदावे कशासाठी ठेवता? वाद कशासाठी घालता? अशी विचारणा करत एकसंधपणे काम करण्याचे आवाहन केलं. यावेळी बोलताना मनसे अध्यक्ष राज यांनी मुंबई महापालिका जिंकण्याचा निर्धार व्यक्त करून दाखवला. ते म्हणाले की मुंबईमध्ये आपला पक्ष सर्वाधिक बलवान असून महापालिकेमध्ये सत्ता आपलीच येणार आहे हे टाळ्या शिकण्यासाठी मी बोलत नाही.
मतदारयादी आणि मराठीच्या मुद्द्यावरूनही कानमंत्र
राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मतदारयादी आणि मराठीच्या मुद्द्यावरूनही कानमंत्र दिला. ते म्हणाले की, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण सर्वांनी कामाला लागा. मतदारयाद्यांवर विशेष लक्ष केंद्रित करा, मतदारयाद्यांवर काम करत असताना जुन्या आणि नवे कार्यकर्त्यांचा एकत्रित करून काम करा असे त्यांनी सांगितले. पक्षाचे जुने कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांना सोबत घ्यावं आणि जे पक्षापासून दूर केले आहेत त्यांना सुद्धा एकत्रित करून तयारीला लागा, असं आवाहन त्यांनी केलं.
युती संदर्भात काय करायचं आहे त्याचा निर्णय मी घेईन
ते पुढे म्हणाले की या युती संदर्भात काय करायचं आहे त्याचा निर्णय मी घेईन. तुम्ही फक्त कामाला लागा असे त्यांनी सांगितलं. दरम्यान मराठीच्या मुद्द्यावरूनही राज ठाकरे यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या. ते म्हणाले की विनाकारण कोणालाही मारहाण करू नका. पहिल्यांदा त्यांना समजावून सांगा, मराठी शिकायला, बोलायला तयार असेल तर त्याला शिकवा. उर्मट बोलत नसेल, तर वाद घालू नका. उर्मट बोलला तर मग पुढे तशी भूमिका घ्या. मात्र हे सर्व करत असताना व्हिडिओ काढू नका, असेही राज ठाकरे यावेळी पदाधिकाऱ्यांना बोलताना म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा