
मुंबई : देशात आणि महाराष्ट्रात होत असलेल्या ईडीच्या (ED) कारवाईवरुन विरोधक नेहमीच आक्रमक होताना दिसून येतात. कारण, ईडीची कारवाई केवळ विरोधी पक्षांतील नेत्यांवर, आमदार, खासदारांवर आणि उद्योजकांवर होत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो. अनेकदा सोशल मीडियातून देखील ईडीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजप सरकारच्या आदेशानेच ईडी काम करत असल्याचे मिम्स आणि जोक्स व्हायरल झाल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे, ईडीसारख्या संस्थेच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यातच, सरन्यायाधीश भूषण गवई (Bhushan gavai) यांनी देखील ईडीसंदर्भात धक्कादायक वक्तव्य केलं आहे. ईडीचा राजकीय वापर कसा होतो हे महाराष्ट्रात बघितलं, तुमचं राजकारण निवडणुकीत करा अशा शब्दात गवई यांनी सरकारला खडे बोल सुनावले आहेत. त्यातच, आता खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सरन्यायाधीशांना नरकातील स्वर्ग हे पुस्तक पाठवले आहे.
शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्यावरही पत्राचाळ घोटाळ्याचे आरोप करत ईडीने गुन्हा दाखल केला होता. 100 दिवस तुरुंगात राहिल्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. मात्र, राऊत यांना जामीन देताना न्यायालयाने ईडीच्या वकिलांना चांगलंच झापलं होतं. आपल्या 100 दिवसांच्या तुरुंगातील अनुभवावर आधारित संजय राऊत यांनी पुस्तक लिहिलं आहे. आपल्या या पुस्तकाची प्रत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांना पाठवली आहे, विशेषत: बड्या भाजप नेत्यांनाही त्यांनी हे पुस्तक वाचण्यासाठी भेट दिलं आहे. आता, सरन्यायाधीशांनी ईडीसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर संजय राऊत यांनी थेट सरन्यायाधीशांना त्यांच्या पुस्तकाची प्रत पाठवली आहे.
संजय राऊतांचे ट्विट
”भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांना नरकातला स्वर्ग पुस्तकाची प्रत पाठवली. न्या. गवई यांनी ईडीचा राजकीय हत्यार म्हणून वापर होत असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. महाराष्ट्रातील घटनांचा संदर्भ न्या.गवई यांनी दिला. ईडीचे अघोरी उद्योग कसे असतात तेच नरकातला स्वर्गमध्ये मी सांगितले आहे,” असे म्हणत संजय राऊत यांनी ट्विट करुन म्हटले.
ईडीबद्दल काय म्हणाले होते सरन्यायाधीश
म्हैसूर शहरी विकास प्राधिकरण घोटाळ्यातील आरोपी असलेल्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नी बीएम पार्वती यांना बजावण्यात आलेले समन्स रद्द करण्याच्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने (ED) दाखल केलेली अपील सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. यावेळी सरन्यायाधीश बीआर गवई आणि न्यायमूर्ती के विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने म्हटले की, राजकीय लढाया न्यायालयाबाहेर लढल्या पाहिजेत. अशा लढाया लढण्यासाठी ईडीचा वापर का केला जातो, असा प्रश्नही त्यांनी विचारला. मतदारांमध्ये राजकीय लढाई लढू द्या. त्यासाठी तुमचा वापर का केला जात आहे? अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केली. त्यानंतर, संजय राऊत यांनी हे पुस्तक सरन्यायाधीशांना पाठवले.
हेही वाचा
आणखी वाचा