
राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी 2006 मधील राज्यसभा निवडणुकीचा संदर्भ देत त्या वेळची परिस्थितीही स्पष्ट केली. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, 2006 साली त्यांची राज्यसभा निवडणूक बिनविरोध झाली होती. त्यानंतर जवळपास 20 वर्षांनी पुन्हा एकदा राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विविध पक्षांमध्ये समंजसपणाची भूमिका दिसून येत आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, जरी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज आपल्यात नसले तरी काँग्रेस, शिवसेना तसेच इतर पक्षांकडूनही सकारात्मक आणि समन्वयाची भूमिका घेतली जात असल्याचे चित्र दिसत आहे. महाराष्ट्रातील सर्व पक्षांनी एकत्रितपणे समंजसपणा दाखवल्यास ही राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता असल्याची चर्चा ऐकू येत असल्याचेही सुप्रिया सुळे यांनी नमूद केले.