
T20 WC: अभिषेक शर्मा आजारातून बरा होत नाही तोच आणखी एक धक्का! फॉर्मात असलेला फलंदाज जखमीImage Credit source: BCCI Twitter
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या जेतेपदासाठी टीम इंडिया प्रबळ दावेदार आहे. मागच्या दोन वर्षातील कामगिरी आणि भारतात स्पर्धा असल्याने टीम इंडियाला जेतेपदाची सर्वाधिक संधी आहे. टीम इंडियाने या स्पर्धेची सुरुवातही विजयाने केली आहे. मात्र टीम इंडियाचं टेन्शन वेगळ्याच कारणाने वाढलं आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच टीम इंडियाला नजर लागली का? असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. कारण हर्षित राणा स्पर्धा सुरू होण्यापूर्वी दुखापतग्रस्त झाला आणि स्पर्धेला मुकला. वॉशिंग्टन सुंदरही दुखापतीमुळे पहिल्या सामन्यात खेळू शकला नाही. त्याचं आता संघात कमबॅक झालं आहे. पण फिट आहे की नाही याबाबत स्पष्टता नाही. दुसरीकडे, स्टार ओपनर अभिषेक शर्माच्या पोटात गडबड झाल्याने रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. त्याला डिस्चार्ज मिळाला आहे. पण दुसऱ्या सामन्यात खेळण्याबाबत साशंकता आहे. असं सर्व घडत असताना टीम इंडियाला आणखी एक धक्का बसला आहे. टीम इंडियाचा फॉर्मात असलेला फलंदाज इशान किशनला दुखापत झाली आहे.
रिपोर्टनुसार, टीम इंडियाच्या सराव शिबिरात इशान किशनला सराव करताना दुखापत झाली. भारताचा दुसरा सामना नामिबियाशी होणार आहे. या सामन्यापूर्वी इशान किशनने नेट प्रॅक्टिस केली. यावेळी त्याला जसप्रीत बुमराह गोलंदाजी करत होता. फलंदाजी करताना इशान किशनच्या पायाला दुखापत झाली आहे. बुधवारी संध्याकाळी अरूण जेटली मैदानात सराव करताना जसप्रीत बुमराहने इशान किशनला भेदक यॉर्कर चेंडू टाकला. हा चेंडू खेळताना इशान चुकला. चेंडू त्याच्या पायाच्या पंजावर जोरात लागला. चेंडू लागताच इशान किशन कळवळला आणि वेदनेने जोरात किंचाळला. त्यानंतर लगेच सराव बंद केला आणि नेटमधून काढता पाय घेतला. फिजिओने त्याच्याकडे धाव घेतली आणि तपासणी सुरू केली आहे. त्याला प्रचंड वेदना होत असल्याचं बोललं जात आहे.
रिपोर्टनुसार, थोडा वेळ वेदना सहन केल्यानंतर इशान किशन पुन्हा एकदा सरावासाठी सज्ज झाला. त्यामुळे क्रीडाप्रेमींचा जीव भांड्यात पडला. एकीकडे अभिषेक शर्माचं जर तर सुरू आहे आणि त्यात फॉर्मात असलेला इशान जखमी झाला तर धाकधूक वाढणार यात काही शंका नाही. दुखापत होत असतानाही इशानने फलंदाजी केली. आता त्याची जखम किती गंभीर आहे हे काय कळू शकलेलं नाही. इशान किशनची दुखापत गंभीर असेल आणि नामिबियाच्या सामन्याला मुकला तर टीम इंडियाच्या ओपनिंगची चिंता वाढेल. संजू सॅमसन हा एकमेव ओपनर असणार आहे. त्यामुळे आता इशान किशनची दुखापत गंभीर नसावी यासाठी क्रीडाप्रेमी प्रार्थना करत आहेत.