Devendra Fadnavis On Vinod Tawde: विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र आजच्या मतदानापूर्वी मंगळवारी विरारमधील विवांता हॉटेलमध्ये बहुजन विकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टीमध्ये तुफान राडा झाल्याचं पाहायला मिळालं. भाजपाकडून पैसे वाटप होत आहेत पक्षाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडेच पैसे वाटप करत असल्याचा आरोप बविआने केला आहे. बविआचे आमदार क्षितीज ठाकूर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी ज्या ठिकाणी तावडे आणि भाजपाचे कार्यकर्ते भेटीसाठी आले होते तिथे येऊन गोंधळ घातला. या ठिकाणी पैशांच्या बॅगा आणि हिशोब लिहिलेल्या डायऱ्या मिळाल्याचा आरोप बविआच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
सोशल मीडियावर तुफान चर्चा
दरम्यान, दुसरीकडे विरोधी पक्षातील उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सूचक पद्धतीने या मागे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचा इशारा केला आहे, सोशल मीडियावरही, विनोद तावडेंचं नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याने ठरवून त्यांना अडकवण्यात आल्याचा दावा अनेकांनी केला आहे. विनोद तावडे प्रकरणावरुन सोशल मीडियावर अनेक बऱ्या, वाईट प्रतिक्रिया, मिम्स, मतं व्हायरल झाल्याचं दिसून येत आहे. असं असतानाच मंगळवारी रात्री उशीरा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तावडे प्रकरणावर प्रतिक्रिया नोंदवली आहे.
‘5 कोटी वाटण्यासाठी आणले’ असा दावा
स्वत: क्षितिज ठाकूर यांनी या हॉटेलमध्ये जाऊन भाजपाकडून पैसे वाटप सुरु असताना रंगेहाथ कार्यकर्ते आणि नेत्यांना पकडल्याचा दावा केला आहे. या प्रकरणानंतर बविआचे अध्यक्ष हिंतेंद्र ठाकूर यांनी ‘झी 24 तास’शी बोलताना, “तावडे 5 कोटी रुपये वाटण्यासाठी आल्याची माहिती मिळालेली,” असा दावा केला आहे. दरम्यान या राड्याचे व्हिडीओ समोर आल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्यानंतर फडणवीस यांनी मंगळवारी रात्री प्रसारमाध्यमांना या प्रकरणी प्रतिक्रिया नोंदवली.
नक्की वाचा >> ‘निवडणूक आयोग आमच्या बॅगा तपासतो आणि इकडे…’; तावडेंचा Video शेअर करत राऊतांचा टोला
…तेव्हा असे प्रकार होतात
“जेव्हा निवडणुकीमध्ये पराभव दिसतो, तेव्हा असे प्रकार होतात. विनोद तावडे आमचे राष्ट्रीय महासचिव आहे. ते फक्त कार्यकर्त्यांना भेटायला गेले होते,” असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच पुढे बोलताना, “कुठलाही पैसा त्यांच्याकडे सापडलेला नाही. कुठलेही आक्षेपार्ह गोष्टी सापडलेल्या नाहीत. उलट त्यांच्यावरच हल्ला झालेला आहे. आमचे उमेदवार राजन नाईक यांच्यावर हल्ला झालेला आहे,” असा आरोप फडणवीसांनी केला आहे. “महाविकास आघाडीच्या इकोसिस्टीमने त्यांचा उद्या दिसणारा पराभव कव्हर करण्यासाठी ही कव्हर फायरिंग केलेली आहे. विनोद तावडे दोषी नाहीत,” असंही फडणवीस म्हणाले आहेत.