
अशोक खरात याच्या कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापलं असून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. अंजली दमानिया यांनी अशोक खरात यांचे काही CDR सार्वजनिक करत गंभीर दावे केले. या CDRमध्ये काही प्रमुख राजकीय नेत्यांशी संपर्क झाल्याचा उल्लेख असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये रुपाली चाकणकर, एकनाथ शिंदे, चंद्रकांत पाटील आणि सुनील तटकरे यांच्यासोबत कॉल झाल्याचा दावा दमानिया यांनी केला होता.
मात्र, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सुषमा अंधारे यांनी दमानिया यांच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “हे CDR दमानिया यांना नेमके कुठून आणि कशा पद्धतीने मिळाले?” असा थेट सवाल अंधारे यांनी केला. तसेच, अशा संवेदनशील माहितीचा स्रोत स्पष्ट करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
दमानिया यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं होतं की, अशोक खरात यांचे CDR त्यांना एका अनोळखी व्यक्तीकडून मिळाले. त्यानंतर त्यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, CDRचा डेटा खूप मोठा असल्याने त्यातील क्रमांक शोधण्यासाठी त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर केला.
या स्पष्टीकरणावरही अंधारे यांनी आक्षेप घेत, दमानिया निवडक प्रकरणांवर आणि निवडक व्यक्तींवरच भाष्य करतात, असा आरोप केला. त्यावर प्रत्युत्तर देताना दमानिया म्हणाल्या, “प्रत्येकाविरुद्ध लढणं हे मी माझं कर्तव्य समजते. जयकुमार रावल यांच्या विरोधात मी गेली पाच वर्षे लढत आहे, कदाचित तुम्हाला याची माहिती नसेल.”
दरम्यान, या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.