
ठाणे : कल्याणमधील (Kalyan) रुग्णालयात कामावर असलेल्या रिसेप्शनीस्ट तरुणीला झालेल्या मारहाण प्रकरणातील आरोपी गोकूळ झा गुंड प्रवृत्तीचा तरुण आहे. फेरीवाल्यांकडून हप्ते गोळा करतो, हेच त्याचे काम असल्याची धक्कादायक माहिती शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख निलेश शिंदे यांनी दिली. तर, पीडित मुलींच्या उपचाराच्या खर्चाची जबाबदारी मनसेने घेतली आहे. उपचारासाठी पीडित मुलीला मनसे कार्यकर्त्यांनी रुग्णालयात दाखल केले असून घटना घडून 22 तास उलटून गेले तरी आरोपी गोकुळ झा पोलिसांना सापडला नाही, तो अद्यापही फरार आहे. त्यामुळे, मनसेच्यावतीने (mns) पोलिसांनाही इशारा देण्यात आला आहे. पुढील काही तासात आरोपी न सापडल्यास आम्ही पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन करू, असे अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे.
कल्याण पूर्वमधील खाजगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या तरुणीवर एका गुंड प्रवृत्तीच्याा तरुणाकडून झालेल्या हल्ल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी स्वतः घटनास्थळी भेट दिली आणि पीडित तरुणीच्या घरी जाऊन तिची भेट घेत उपचाराच्या खर्चाची संपूर्ण जबाबदारी उचलण्याचे आश्वासनही दिले. “त्या मुलीची शारीरिक अवस्था पाहून संताप अनावर होतो. छाती, पाठ, पायावर मारहाण झाली असून तिला तातडीने रुग्णालयात भरती करणं गरजेचं आहे. तिची स्थिती गंभीर असून ती कालपासून तशीच आहे, कपडेही बदललेले नाहीत.”, असे अविनाश जाधव यांनी म्हटले.
पोलिसांच्या कारवाईवरही जाधव यांनी संताप व्यक्त केला आहे. “घटना घडून २२ तास उलटून गेले तरी आरोपी गोकुळ झा फरार आहे. आमच्या कार्यकर्त्यांना रात्रीच्या वेळी उचलता, मग अशा गुन्हेगाराला का नाही?”,असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. तसेच, हा प्रकार मराठी-अमराठी वाद नसला तरीही “जर बाहेरून आलेला व्यक्ती आमच्या मराठी मुलीला अशा पद्धतीने मारत असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही,” असा थेट इशारा अविनाथ जाधव यांनी दिला. “जर लवकरात लवकर आरोपीला अटक झाली नाही, तर आम्ही पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन छेडू,” असा स्पष्ट इशारा मनसेने दिला आहे. दरम्यान, “मतासाठी काही नेते बाहेरून माणसं आणून बसवतात आणि त्यांना वाटतं, काहीही केलं तरी सगळं माफ”, असे म्हणत राजकीय नेत्यांवरही जाधव यांनी टीका केली आहे.
शालिनी ठाकरेंचा गृहखात्यावर निशाणा
कल्याणमधल्या मुलीला मारहाण होऊन 24 तास उलटले आहेत. राज्याचं गृहखातं इतकं कमजोर आहे का? की एका तिरपट गुंडाला 24 तासांत शोधू शकत नाही? महाराष्ट्रातल्या आया-बहिणींवर हात उचलले जात असतील, आणि गुन्हेगार मोकाट फिरणार असेल तर राज्याची सुरक्षा रामभरोसे आहे म्हणावं लागेल. कल्याणच्या मुलीला न्याय मिळायलाच हवा, त्या नराधमाला लवकरात लवकर अटक झालीच पाहिजे आणि कडक शिक्षा देखील व्हायला पाहिजे, असे ट्विट मनसेच्या शालिनी ठाकरे यांनी केलं आहे.
रुग्ण मुलीवर गरजेचे उपचार केले
रुग्णाला जास्त मारहाण झाली असून तिच्या हाता-पायाला दुखापत झाल्याने तिला नीट हालचाल करता येत नाही. आपण पेशंटचं एक्स रे केलं आहे, पुढे एमआरआय करण्याची गरज भासल्यास करू, सध्या गरजेचे उपचार तिच्यावर केल्याची माहिती ग्लोबलमधील डॉ. ऋतुजा जानकी यांनी दिली.
हेही वाचा
सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळांसाठी ऑनलाइन एक खिडकी प्रणाली सुरू; गणेशभक्तांना असा करावा लागेल अर्ज
आणखी वाचा