
Vaibhav Khedekar: राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मनसेतून (MNS) निलंबित झाल्यानंतर चर्चेत असलेले खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर (Vaibhav Khedekar) यांनी अखेर भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या उपस्थितीत आणि संतोष नलावडे यांच्यासह खेडेकरांचा भाजप प्रवेश पार पडला.
Vaibhav Khedekar: तीन वेळा पुढे ढकलला गेलेला पक्षप्रवेश
भाजपमध्ये खेडेकर यांच्या प्रवेशाचा मुहूर्त तब्बल तीन वेळा पुढे ढकलण्यात आला होता. दरवेळी पक्षप्रवेशाच्या चर्चा झडत असतानाच कोणती ना कोणती अडचण समोर येत होती. त्यामुळे त्यांच्या राजकीय भवितव्यासंदर्भात संभ्रमाचे वातावरण तयार झाले होते. मात्र आज झालेल्या पक्षप्रवेशाने त्या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
Vaibhav Khedekar: वैभव खेडेकरांची राजकीय पार्श्वभूमी
वैभव खेडेकर हे मनसेचे जुने आणि कोकणातील प्रभावी नेते म्हणून ओळखले जात होते. राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक अशीही त्यांची प्रतिमा होती. मात्र, अलीकडच्या काळात त्यांची भाजप व शिंदे गटाशी जवळीक वाढली होती. भाजपमध्ये जाण्याची तयारी करताच मनसेने तत्काळ त्यांच्यावर कारवाई करत पक्षातून हकालपट्टी केली होती. त्यानंतर खेडेकर यांनी भाजप प्रवेश निश्चित केला असला तरी त्यात विलंब होऊ लागला. त्यामुळे राजकीय वर्तुळात ‘भाजपने त्यांना झुलवतंय का?’ असा प्रश्न उपस्थित होऊ लागला होता.
Vaibhav Khedekar: वैभव खेडेकर भाजपमध्ये दाखल
भाजप प्रवेश रखडल्याने खेडेकर स्वतः मुंबईत येऊन भाजप नेत्यांची भेट घेऊ लागले होते. रवींद्र चव्हाण, प्रवीण दरेकर यांच्याशीही त्यांनी चर्चा केली होती. पक्षप्रवेश कधी होणार, यावर प्रश्नचिन्ह कायम असतानाच आज अचानक त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश पार पडला आहे. खेडेकर यांचा भाजपमध्ये प्रवेश हे केवळ वैयक्तिक राजकीय पुनरागमन नसून, कोकणात भाजपची घडी अधिक मजबूत करण्याच्या रणनीतीचा भाग असल्याचे विश्लेषण होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची संघटना बळकट करण्याच्या दृष्टीने या प्रवेशाला महत्त्व दिलं जात आहे.
Vaibhav Khedekar: काय म्हणाले वैभव खेडेकर?
भाजप प्रवेशानंतर वैभव खेडेकर एबीपी माझाशी बोलताना म्हणाले की, पक्षप्रवेश कोणी रखडवला हे एका बाईटमध्ये सांगण्यासारखं नाही. तुम्ही माझी सविस्तर मुलाखत घ्या, मी जरुर सांगेन. मात्र आज तो दिवस नाही. माझ्या देवाने स्वत:पासून दूर केलं, काही कारणं झाली असतील मात्र दुरावा निर्माण झाल्याने मला दुःख आहे. आता जोमाने भाजप वाढवण्यावर आमचा भर असेल. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत शतप्रतिशत भाजप करण्यावर भर असेल. मनसेतील अनेक नेत्यांसोबत भावनिक नाती तयार झाली होती. ती आज थांबत असल्याचं दुःख आहे. मात्र, भाजपनं देखील मला आपलंसं केलंय याचा आनंद वाटतो, असे त्यांनी म्हटले.
Shiv Sena UBT: उत्तर महाराष्ट्रात ठाकरे गटाला मोठा धक्का
दरम्यान, शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या राज्य संघटक ॲड. ललिता शाम पाटील आणि अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक पराग पाटील यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह शिवसेना ठाकरे गटाला सोड चिठ्ठी दिली आहे. त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केल्याने उत्तर महाराष्ट्रात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मुंबईमध्ये आज झालेल्या एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश पार पडला.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा Video
आणखी वाचा
आणखी वाचा