CM Fadnavis On Santosh Deshmukh Murder Case Mention Walmik Karad: विधानसभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सविस्तर निवेदन केलं. बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचं फडणवीस म्हणाले. हे प्रकरण हत्येपुरते मर्यादित नसून या प्रकरणाची पाळेमुळे खणून बीड जिल्ह्यातील कायद्याची स्थिती बदलावी लागेल, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. तसेच बीड जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षकांची बदली केली जाणार असल्याची माहिती फडणवीसांनी सभागृहाला दिली. या हत्याकांडाची पोलीस महानिरिक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जाणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सदर प्रकरणामध्ये न्यायालयीन चौकशीही केली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
वाल्मिक कराडचा थेट उल्लेख
“बीड प्रकरणात मास्टर माईंड कुणीही असो कारवाई करणारच,” असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं. या प्रकरणामध्ये बीडचे आमदार आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय बीडचे माजी नगराध्यक्ष वाल्मिक कराड यांचा थेट संबंध असल्याचे आरोप केले जात आहेत. फडणवीस यांनी थेट वाल्मिक कराड यांचं नाव घेत सभागृहामध्ये विधान केलं. “वाल्मिक कराडबद्दल पुरावे असतील, कुणासोबत फोटो असतील याचा विचार न करता कारवाई केली जाईल,” असं फडणवीस यांनी आपल्या भाषणात ठामपणे सांगितलं.
नक्की वाचा >> महाराष्ट्राला हादरवणाऱ्या सरपंच हत्याकांडात वाल्मिक कराडचं नाव का घेतलं जातंय? तो आहे तरी कोण?
बीड जिल्ह्यात उद्योगांना त्रास देणारे…
“बीड जिल्ह्यात अराजकाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. कायदा अबाधित ठेवण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे. यापुढे असे प्रकार सहन करणार नाही. यांची पाळेमुळे खणून काढू,” असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला दिलं. “आरोपींसोबतच्या सर्वांवर एकत्रितपणे मकोका लावणार. सर्व संबंधित आरोपींना संघटित गुन्हेगारांवर कारवाई होणार आहे,” असं मुख्यमंत्री म्हणाले. बीड जिल्ह्यात उद्योगांना त्रास देणारे, गुन्हेगारी करणाऱ्यांवर एका विशेष मोहिमेद्वारे कारवाई करू असंही मुख्यमंत्री सभागृहाला आश्वस्त करताना म्हणाले.
10 लाखांची मदत करणार
पोलीस निरिक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून या प्रकरणामध्ये आम्ही सरकार म्हणून कारवाई करत आहोत, असं फडणवीस म्हणाले. तसेच सदर प्रकरणामध्ये न्यायालयीन चौकशी देखील करू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ही कारवाई तीन ते सहा महिन्यात पूर्ण करू असं जाहीर करतानाच सरकार मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना दहा लाखांची मदत देणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पोलीस प्रशासनाची भूमिका पाहता जिल्हा पोलीस अधीक्षकांची बदली होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
विरोधकांचा सभात्याग
मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवेदन केल्यानंतर या विषयावर बोलण्याची परवानगी विरोधकांनी मागितली. मात्र सभापती राहुल नार्वेकरांनी या चर्चेमध्ये नियमानुसार उत्तर देण्यासाठी परवानगी देता येणार नाही असं विरोधकांना सांगितलं. त्यामुळे निषेध म्हणून विरोधकांनी सभात्याग केला.