
मुंबई : राजकारणात काही दिवस, काही घटना आणि काही गाठीभेटी या इतिहासात कायमस्वरुपी नोंदवल्या जातात. अशीच एक ऐतिहासिक भेट आज घडली. ही भेट होती राज आणि उद्धव ठाकरेंची. म मराठीचा की म महापालिकेचा ही चर्चा सुरु असताना यावेळचा म मात्र मातोश्रीचा होता. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचं निमित्त साधत राज ठाकरेंनी एक सरप्राईज भेट ठरवली आणि तातडीनं ती अंमलातही आणली. त्यामुळं उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचं सरप्राईजही मिळालं आणि दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आशांना पुन्हा नव्यानं पालवी फुटली. आता ही पालवी युतीची मुळं धरणार की पुन्हा एकदा कोमेजून जाणार, याकडं सर्वांचं लक्ष आहे. पाहूया, आज दिवसभरात नेमकं काय घडलं.
दोन दशकांपूर्वी राज ठाकरे मातोश्रीवरून बाहेर पडले तेव्हा उद्धव ठाकरे चाळीशीच्या मध्याकडे प्रवास करत होते. 2006 मध्ये मनसेची स्थापना केल्यापासून राज ठाकरे एकदाही उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसासाठी मातोश्रीवर आले नव्हते. अखेर हा योग जुळून आला उद्धव ठाकरेंच्या 65 व्या वाढदिवशी. या सरप्राईज भेटीमागे काय काय घडामोडी घडल्या, याची इत्यंभूत माहिती एबीपी माझाचा हाती आली आहे.
राज ठाकरेंचा फोन अन् मातोश्रीवर लबगब
त्याचं झालं असं… राज ठाकरेंनी बाळा नांदगावकरांच्या फोनवरून संजय राऊतांना फोन लावला. आपण मातोश्रीवर येत असल्याचं राऊतांना सांगितलं. राऊतांनी क्षणार्धात हा निरोप मातोश्रीवर पोहोचवला आणि मातोश्रीवर राज यांच्या स्वागतासाठी एकच लगबग सुरु झाली.
दोन्ही बंधूंची गळाभेट
दुपारी 12 वाजून 5 मिनिटांनी राज ठाकरेंचा ताफा मातोश्रीवर दाखल झाला. त्यांच्या स्वागतासाठी उद्धव ठाकरे सहकुटुंब हजर होते. राज ठाकरे गाडीतून उतरल्यानंतर उद्धव ठाकरेंनी दरवाजातच त्यांचं स्वागत केलं. दोन्ही बंधूंची गळाभेट झाली. त्यानंतर वाढदिवसासाठी खास उभारण्यात आलेल्या पोडियमकडं ठाकरे बंधू गेले. तिथं राज यांनी उद्धव यांना अभिष्टचिंतन करत सोबत आणलेला पुष्पगुच्छ दिला. त्यानंतर उद्धव ठाकरे राज यांना घेऊन घरात गेले.
बाळासाहेबांच्या खुर्चीचं दर्शन घेतलं
शिवसेनाप्रमुखांच्या फोटोसमोर उभं राहून ठाकरे बंधूंनी एक फोटोही काढून घेतला. त्यानंतर राज ठाकरे पोहोचले एका खास खोलीत. शिवसेनाप्रमुखांची ही खोली. या खोलीत असणाऱ्या शिवसेनाप्रमुखांच्या आयकॉनिक खुर्चीचं राज यांनी दर्शन घेतलं.
ज्या बाळासाहेबांचं बोट धरून राजकीय धडे गिरवले, ज्या खुर्चीवर बसून बाळासाहेब सर्व महत्त्वाचे निर्णय घ्यायचे, त्या खुर्चीला राज यांनी वंदन केलं. वीस वर्षांनंतर इतक्या मोकळेपणानं मातोश्रीवर आलेल्या राज ठाकरेंच्या डोळ्यांसमोरून मातोश्रीवरील एकत्र कुटुंबाच्या आठवणींचा पट कदाचित तरळून गेला असावा.
राज ठाकरेंची सूचक पोस्ट
दुपारी 12 वाजून 25 मिनिटांनी राज ठाकरे मातोश्रीवरून रवाना झाले. या भेटीनंतर राज ठाकरेंनी ट्विट करत उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या. मात्र दोन ओळींच्या या ट्विटमधील काही शब्द हे सर्वांचंच लक्ष वेधून घेणारे ठरले.
‘माझे मोठे बंधू, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या‘ असं राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं.
उद्धव ठाकरेंच्या पदाचा आणि मातोश्रीसोबत शिवसेनाप्रमुखांच्या नावाचा केलेला उल्लेख दिवसभर चर्चेचा विषय राहिला. जवळपास 20 वर्षांनी ही 20 मिनिटांची भेट झाली. पण या भेटीनं दोन्ही पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते चांगलेच भारावून गेले.
महाराष्ट्राच्या मनात वेगळंच, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
या भेटीकडं महायुतीचे नेते कसे पाहतात, याची उत्सुकता होती. या भेटीत राजकारण पाहणं योग्य नसल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली. मात्र हे सांगताना गेल्या विधानसभेचा आणि आगामी महापालिका निवडणुकांचा संदर्भ द्यायला ते विसरले नाहीत. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी ते गेले आहेत. आनंदाची गोष्ट आहे. याकडे राजकारण म्हणून पाहणं योग्य नाही. आमच्या पण त्यांना शुभेच्छा आहेत. महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे तुम्हाला विधान सभेच्या निवडणुकीत दिसलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही दिसेल. काही नेत्यांच्या मनात काय आहे ते महाराष्ट्राच्या मनातील आहे असं म्हणणं योग्य नाही.
याच महिन्यात 5 तारखेला मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र आले होते. त्यानंतर आज पुन्हा राज ठाकरेंनी मातोश्रीवर सरप्राईज भेट दिल्यामुळं उद्धव ठाकरेंसह दोन्ही पक्षीयांचा आनंद द्विगुणित झाला आहे.या आनंदाप्रमाणंच राजकीयदृष्ट्या एकत्र येत दोन्ही ठाकरे आपली ताकद द्विगुणित करणार का, याकडं आता सर्वांचं लक्ष आहे.
आणखी वाचा