Who is Hitendra Thakur: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे हितेंद्र ठाकूर कोण आहेत?

Who is Hitendra Thakur: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे हितेंद्र ठाकूर कोण आहेत?


Who is Hitendra Thakur: विरारमध्ये आज भाजपा (BJP) आणि बहुजन विकास आघाडीच्या (Bahujan Vikas Aghadi) कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. बविआच्या कार्यकर्त्यांनी भाजपा नेते विनोद तावडे (Vinod Tawde) यांना तब्बल 4 तास घेरलं होतं. यावेळी हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) आणि क्षितीज ठाकूरही (Kshitij Thakur) तिथे उपस्थित होते. विनोद तावडे 5 कोटी रुपये वाटण्यासाठी आले होते असा आरोप हितेंद्र ठाकूर यांनी केला. विनोद तावडे वाड्याला गेले तिकडून 5 कोटी रुपये घेऊन येथे आले. त्यांच्या डायऱ्या मिळाल्या, लॅपटॉप मिळाले आहेत. त्यात सगळा हिशोब आहे. कोणत्या लायकीचे लोक आहेत हे? हे शिक्षणमंत्री होते आपले. यांना लाज शरम वाटते की नाही? अशी विचारणाही त्यांनी केली आहे. दरम्यान यानिमित्ताने हितेंद्र ठाकूर आणि क्षितीज ठाकूर ही दोन नावं आज महाराष्ट्रभर चर्चेत आहेत.

 
हितेंद्र ठाकूर कोण आहेत?

हितेंद्र ठाकूर यांचा जन्म वसईतच 1961 मध्ये झाला. असं सांगतात की, राजकारणात येण्याआधी ते आपल्या भावासह डेअरी फार्म चालवत होते.  1988 मध्ये रिअल इस्टेट उद्योजक सुरेश दुबे यांची हत्या झाली होती. हितेंद्र ठाकूर यांचे बंधू जयेंद्र उर्फ भाई ठाकूर यांच्यावर हत्येचा आरोप झाला होता. 

हितेंद्र विष्णू ठाकूर हे वसईचे विद्यमान आमदार आहेत. तसंच बहुजन विकास आघाडीचे प्रमुख आहेत. पालघर हा त्यांचा बालेकिल्ला असून त्यांची जिल्ह्यात मोठी राजकीय ताकद आहे. 1988 पासून ते राजकारणात सक्रीय आहेत. काँग्रेसमधून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. वसई तालुका युवा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. नंतर 1990 मध्ये वयाच्या 29 व्या वर्षी पालघर जिल्ह्यातील वसई-विरारचे आमदार म्हणून ते निवडून आले. पण नंतर त्यांनी स्वत:चा वसई विकास मंडळ नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला. या पक्षाचं नाव नंतर बदलून बहुजन विकास आघाडी करण्यात आलं. हितेंद्र ठाकूर आतापर्यंत 4 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. 

बहुजन विकास आघाडीचं वसई-विरार महानगरपालिकेवर बहुमत आहे. याशिवाय वसई तालुका पंचायत समिती, तसंच पालघर जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये बहुजन विकास आघाडी पक्षाची ताकद आहे.

क्षितीज ठाकूर कोण आहेत?

क्षितीज ठाकूर हे हितेंद्र ठाकूर यांचे पुत्र आहेत. ते नालासोपारा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. 2009 पासून सलग 3 वेळा ते आमदार म्हणून निवडून आले आहेत. नालासोपाऱ्यात त्यांची चांगली पकड आहे. 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत क्षितिज यांनी माजी पोलीस अधिकारी आणि शिवसेना उमेदवार प्रदीप शर्मांचा पराभव केला होता.

पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप

2013 साली मुंबईतील वांद्रे वरळी-सी लिंकवरील टोल नाक्याजवळ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी क्षितीज ठाकूर यांची कार अडवली होती. त्यावेळी क्षितिज ठाकूर आणि सूर्यवंशी यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर काही दिवसांनी विधीमंडळ अधिवेशन सुरु असताना सूर्यवंशी विधीमंडळ परिसरात आले होते. त्यावेळी क्षितिज ठाकूर यांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप झाला होता. मनसे नेतेही त्यात सहभागी झाल्याचा आरोप होता. आमदारांनी पोलिसांना मारहाण केल्याने विधीमंडळात हा मुद्दा प्रचंड गाजला होता. 

फौजदारी खटले आणि आर्थिक मालमत्ता

हितेंद्र ठाकूर यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, एकट्या हितेंद्र ठाकूर यांची जंगम मालमत्ता 39 कोटी रुपये आहे. त्यांच्या पत्नीची जंगम मालमत्ता 23 कोटी रुपये आहे. हितेंद्र ठाकूर यांची स्थावर मालमत्ता सुमारे 46 कोटी रुपये आहे. त्यांच्या पत्नीकडे 24 कोटींची स्थावर मालमत्ता आहे. हितेंद्र यांनी आपण व्यावसायिक असल्याचं सांगितलं आहे. त्यांच्या पत्नीही व्यावसायिका आहेत.

महाराष्ट्र शासनाने नव्याने वसलेल्या-विरार महानगरपालिकेत 53 गावं समाविष्ट करण्यासाठी अधिसूचना जारी केली होती. पण 49 गावांनी विरोधी उमेदवार विवेक पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणीय आणि वारसाविषयक समस्येचे कारण देत विलीनीकरणाला विरोध केला आणि समिती स्थापन करुन नकार दिला. यामुळे विवेक पंडित यांना अटक करण्यासाठी आणि मारहाण केल्याचा आरोप ठाकूर यांच्यावर करण्यात आला होता. 

हितेंद्र यांच्यावर वर एकूण 4 खटले दाखल असून, त्याची सुनावणी न्यायालयात सुरू आहे. हितेंद्र यांच्याशिवाय मुलगा क्षितिज आणि सूनही राजकारणात आहेत. हितेंद्र यांचा दुसरा मुलगा उत्तांग हा व्यवसाय करतो.

पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी हितेंद्र ठाकूरही ईडीच्या रडारवर आहेत. 2021 मध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकण्यात आले होते. 2019 मध्ये हितेंद्र यांच्या पक्षाचे 3 आमदार निवडणूक जिंकले. हितेंद्र यांनी अनेक वेळा भाजपला पाठिंबा दिला होता.

2024 च्या निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात राज्यसभेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. त्यावेळी भाजपचे ज्येष्ठ मंत्री गिरीश महाजन हे हितेंद्र यांच्या घरी पाठिंबा मागण्यासाठी गेले होते.





Source link

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *