नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांची कार्यभाराने उपायुक्त पदावर नेमणूक करुन त्यांना कार्यकारी विभाग देण्याची लेखी मागणी कामगार नेते व नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आकृतीबंधात उपायुक्त संवर्गाची एकुण ११ पदे निर्मित असून यातील ६ पदे नवी मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांतून व ५ पदे प्रतिनियुक्तीद्वारे नियुक्त करणे क्रमप्राप्त आहे. सद्यस्थितील केवळ एकाच पदावर नवी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांतून उपायुक्त नियुक्त करण्यात आलेला आहे. नवी मुंबई महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांना नेहमीच अकार्यकारी विभाग दिला जावून त्यांच्यावर अन्याय केला जात आहे. भांडार, आपात्कालीन, ग्रंथालये, समाजविकास, मालमत्ता अशा दुय्यम खात्यांवर महापालिकेतील अधिकारी नेमले जातात, हे अन्यायकारक असल्याचे रविंद्र सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे.
शासनाच्या सेवेतील उपजिल्हाधिकारी, मुख्याधिकारी व मंत्रालयीन सेवेतील अधिकारी उपायुक्त पदावर प्रतिनियुक्तीने नेमणे बंधनकारक असताना वैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी, जिल्हा उपनिबंधक, वस्तु व सेवाकर या विभागातील अधिकारी अनेकदा उपायुक्त पदावर प्रतिनियुक्त करण्यात आलेले आहेत. याचप्रमाणे महापालिका कोट्यातील उर्वरित ५ जागांवर महानगरपालिकेच्या अनुभवी वैद्यकीय अधिकारी तथा इतर तांत्रिक संवर्गातील अधिकाऱ्यांची ‘उपायुक्त’ पदावर कार्यभाराने नियुक्ती करण्यात यावी व त्यांना कार्यकारी विभागाचा कार्यभारही देण्याची मागणी रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.