
मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच (Election) राजकीय गणित बदलताना दिसून येत आहे. काही महिन्यांपूर्वी मनसे महायुतीत येणार असल्याची चर्चा सुरू असतानाच, आता मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युतीची चर्चा रंगत आहे. दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेनं (Shivsena) एक पाऊल पुढे टाकत रिपल्बिकन पक्षासोबत युती केली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू आनंदराज आंबेडकर यांच्या रिपल्बिकन सेना पक्षासोबत युती केल्यानं पुन्हा एकदा शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आल्याचं बोललं जात आहे. युती विचारांची, विश्वासाची आणि विकासाची या घोषणेसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि आनंदराज आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत युतीबाबत घोषणा केली, यावेळी दोघांनीही हातात हात घेत सर्वांना अभिवादन केले. तसेच, शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने घोषणाबाजी देखील केली.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसेना एकनाथ शिंदे यांनी दलित आणि मराठी मतांच्या गणिताची जुळवाजुळव केली आहे. शिवसेना आणि आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेची युती झाल्याची घोषणा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच, दोन्ही पक्ष महापालिका आणि झेडपीच्या निवडणुका एकत्र लढणार आहेत, असेही त्यांनी जाहीर केले. एकनाथ शिंदे यांनी बेरजेचं गणित आखलं असून आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेला सोबत घेतलं आहे. त्या माध्यमातून मराठी आणि दलित मतदार सोबत घेण्याची खेळी शिंदेंनी खेळल्याची चर्चा आहे.
एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात अनेक चांगल्या योजना महाराष्ट्रात आल्या, शोषित, वंचित, गरिबांसाठी त्यांनी केलेलं काम चांगलं आहे. त्यामुळे, कुठल्याटी अटी न बांधता आम्ही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाण्याचं ठरवलं आहे. केवळ, आमच्या कार्यकर्त्यांना सत्तेत सामावून घ्या, अशी विनंती आम्ही केली असून त्यांनी ती मान्य केल्याचंही आनंदराज आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
शिवशक्ती-भीमशक्ती युतीची सुरुवात ठाण्यातूनच
आनंदराज आंबेडकर यांचा आणि माझा स्वभाव सर्वसामान्यांसारखा आहे. सर्वसामान्यांसाठी काहीतरी करावं हेच आमचं ध्येय असतं. सत्ता ही सर्वसामान्यांसाठी वापरली पाहिजे, गोरगोरीब, दलित, शोषित, कष्टकरी यांना सत्तेचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी सत्ताधाऱ्यांनी काम केलं पाहिजे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनाही तेच वाटायचे. आज बाबासाहेबांच्या रक्ताचा वारसा असलेले आंनदराज आहेत, दलित, पीडित, शोषितांसाठी ते काम करत आहेत. विचारांची, विश्वासाची आणि विकासाची ही युती असल्याचेही एकनाथ शिंदेंनी म्हटलं. तसेच, यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी देखील शिवशक्ती-भीमशक्ती अशी युती केली होती. महाराष्ट्रात कुठेही नव्हती, पण आमच्या ठाण्यामधून शिवशक्ती-भीमशक्तीच्या युतीला सुरुवात केली होती, अशी आठवणही यावेळी शिंदेंनी सांगितली.
हेही वाचा
मोठी बातमी : विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा आज निरोप समारंभ, पुन्हा विधानपरिषदेत परतणं कठीण?
आणखी वाचा