
अमरावतीत रामपुरी कॅम्पसमध्ये बिबट्याचा शिरकाव झाल्याची घटना घडल्याने त्याला पकडण्यासाठी वन अधिकारी, पोलीस आणि प्रशासनाने मोठी फिल्डींग लावली होती. हा बिबट्या दुकानात लपला असल्याचा संशय असल्याने अधिकाऱ्यांनी जाळ्या अडकवून त्याला पकडण्यासाठी जय्यत तयारी केली. मात्र, बघ्यांची प्रचंड गर्दी झाल्याने बिबट्या घाबरुन बाहेर पडण्याचे नावच घेत नसल्याने मोठी पंचाईत झाल्याचा प्रकार घडला.
अमरावती शहराच्या मध्यवस्तीत हा बिबटा शिरल्याने नागरिकांची चांगली घाबरगुंडी उडाली आहे.हा बिबट्या रिकाम्या गाळ्या शिरल्याचा संशय असल्याने या गाळ्याच्या शटरना जाळ्या लावून त्यांना या बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न वनअधिकारी दुपारपासून करत आहे. या बिबट्या पळून जाऊ नये यासाठी पोलिसांनी त्यांची वाहने देखील अडसर करुन लावली आहेत. बिबट्या अशा प्रकारे शहराच्या अंतर्गत भागात पोहचल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. राज्यात अलिकडे बिबटे मानवी वस्तीत शिरकाव करत असल्याने नागरिकांवर हल्ले होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
मानवी वस्तीत बिबट्यांचा वाढता शिरकाव
बिबटे मानवी वस्तीत शिकारीसाठी शिरत असल्याच्या घटना राज्यातील नगर, पुणे या भागात अलिकडे वाढल्या आहेत. बिबटे शिकारीच्या शोधात शहरात शिरत असून कुत्रे आणि कोंबड्यांची शिकार करत आहे. तसेच ते मानवांवर हल्ले देखील करत आहेत. या बिबट्यांच्या समस्येवर उपाय म्हणून त्यांना पकडून इतरत्र अभयारण्यात सोडण्याचा सल्ला दिला जात आहे. राज्याच्या ग्रामीण भागात रात्री शेतीवर पाण्याची मोटर सुरु करण्यासाठी किंवा राखणीसाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांनी बिबट्यांनी लक्ष्य केल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विशेष म्हणजे बिबट्यांचे प्रजनने वेगाने होत असून ते उसाच्या शेतात राहात असल्याचेही उघडकीस आल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे.