
पुणे महापालिकेपाठोपाठ आता मुंबई महानगरपालिकेतही धमकीचा मेल आल्याने राजकीय आणि पालिका वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना एका अज्ञात इसमाकडून जीवे मारण्याची आणि त्यांच्या कार्यालयात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली आहे. या अज्ञात इसमाने थेट ई-मेल पाठवून महापौरांची अधिकृत गाडी आणि महापालिका मुख्यालयातील त्यांचे केबिन बॉम्बने उडवून देऊ असा उल्लेख केला आहे. या प्रकारानंतर मुंबई पोलीस आणि पालिकेची सुरक्षा यंत्रणा कमालीची सतर्क झाली आहे.
पोलिसांचा तपास सुरू
मिळालेल्या माहितीनुसार, हा धमकीचा ई-मेल प्राप्त होताच महापालिका प्रशासनाने तातडीने मुंबई पोलिसांना याची माहिती दिली. या घटनेचे गांभीर्य ओळखून मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेसह सायबर सेलने या प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर हाती घेतला आहे. ज्या आयपी अॅड्रेसवरून (IP Address) हा धमकीचा ई-मेल पाठवण्यात आला आहे, त्याचा तांत्रिक शोध घेतला जात आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महापालिका मुख्यालयातील सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे. मुख्यालयात येणाऱ्या प्रत्येक वाहनाची आणि व्यक्तीची कसून तपासणी केली जात आहे. महापौरांच्या केबिनबाहेर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, त्यांच्या दौऱ्यांदरम्यान आणि प्रवासादरम्यान वैयक्तिक सुरक्षेतही मोठी वाढ करण्यात आली आहे.
उपमहापौर संजय घाडी यांची प्रतिक्रिया
या धक्कादायक घटनेवर मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांनी चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “जर असा मेल आला असेल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. सुरक्षा विभाग आणि पोलिसांनी याकडे तातडीने लक्ष दिले पाहिजे. तसेच महापौरांना तात्काळ अतिरिक्त सुरक्षा पुरवण्यात यावी.”
हा ई-मेल एखाद्याने खोडसाळपणाने केला आहे की यामागे काही मोठे कारस्थान आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. महापालिका प्रशासनाने कर्मचाऱ्यांना आणि सुरक्षारक्षकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले असून संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती आढळल्यास तातडीने कळवण्यास सांगितले आहे.
पुणे महापालिकेतही धमकीचे सत्र; दीड तास तपासणी
मुंबईपूर्वी पुणे महानगरपालिकेतही अशाच प्रकारचा धमकीचा मेल आला होता. पुणे महापौर कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर पोलिसांनी तसेच दोन बॉम्ब शोधक व नाशक पथकांकडून महापौर कार्यालयाची कसून तपासणी केली होती. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व कर्मचाऱ्यांना पालिकेच्या मुख्य इमारतीबाहेर काढण्यात आले होते. तब्बल दीड तासांच्या कसून तपासणीनंतर काहीही संशयास्पद न आढळल्याने कर्मचाऱ्यांनी पुन्हा पालिकेत कामकाज सुरू केले. या पार्श्वभूमीवर आता मुंबईतही पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येत आहे.