
2015 मध्ये हा सर्वांत सस्पेन्स आणि थ्रिलर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाच्या अगदी सुरुवातीलाच एका हत्येची घटना दाखवण्यात आली होती. त्यानंतर पुरावे इतक्या काळजीपूर्वक लपवले गेले की संपूर्ण पोलीस दल खुन्याच्या मागे लागले, पण समोर असूनही त्याला पकडू शकले नाहीत.
अगदी शेवटपर्यंत पोलिसांना या खुनाचं रहस्य उलगडता आलं नाही. विशेष म्हणजे खुनी त्यांच्या समोरच दबा धरून बसला होता. पोलिसांना तो माहितही होता, पण त्याला ते पकडू शकत नव्हते किंवा त्याच्याविरोधात पुरावा मिळवू शकत नव्हते. 31 जुलै 2015 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं नाव 'दृश्यम' असं आहे.
'दृश्यम' हा मल्याळम चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. हिंदीत अजय देवगण, तब्बू, इशिता दत्ता, श्रिया सरन, मृणाल जाधव, कमलेश सावंत आणि रजत कपूर यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन निशिकांत कामत यांनी केलं होतं. या चित्रपटाची कथा इतकी प्रभावी होती की शेवटपर्यंत प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवलं होतं.
'दृश्यम' या चित्रपटाला आयएमडीबीवर (IMDb) दहापैकी 8.2 इतकी रेटिंग मिळाली आहे. सुरुवातीला या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी सैफ अली खानला विचारण्यात आलं होतं. नंतर अजय देवगणला या चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती. अजयच्या अटीनुसार या चित्रपटाचं शूटिंग फक्त 90 दिवसांमध्ये पूर्ण करण्यात आलं होतं.
या चित्रपटात अजय देवगणने चौथी नापास झालेल्या एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबप्रमुखाची भूमिका साकारली होती. त्याने साकारलेली विजय साळगावकरची भूमिका आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. तर तब्बू यामध्ये इन्स्पेक्टर जनरल मीना देशमुखच्या भूमिकेत होती. या चित्रपटातील काही दृश्यांवरून सोशल मीडियावर बरेच मीम्ससुद्धा व्हायरल झाले होते.