
माऊलींच्या पालखीचे आज पंढरीकडे प्रस्थान
Idrayani River Overflow, Traffic Route Change: संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला अवघे काही तास शिल्लक असताना आळंदीत अद्यापही पूरस्थिती कायम आहे.अनेक दुकाने अजूनही पाण्याखाली असल्याची परिस्थिती पहायला मिळत आहे तर इंद्रायणी नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले असून प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. इंद्रायणी स्नान सध्या बंद ठेवण्यात आले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून एनडीआरएफचे पथक तैनात करण्यात आले आहे.
इंद्रायणी दुथडी, चारही पूल पाण्याखाली
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला आता अवघे काही तास शिल्लक आहेत. पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी इंद्रायणी नदी अद्याप दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे वारकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे इंद्रायणी स्नान सध्या बंद करण्यात आले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाने एनडीआरएफचे पथक तैनात केले असून संपूर्ण परिसरात सतर्कता वाढविण्यात आली आहे.
वारकऱ्यांसाठी मोफत अन्नदान
आळंदीत मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर आल्याने हजारो वारकरी विविध ठिकाणी अडकून पडले. वारकऱ्यांसाठी शिवसेना आळंदी शहरप्रमुख राहुल चव्हाण यांच्या पुढाकारातून मोफत अन्नदान करण्यात आले. शेकडो वारकरी भाविकांना प्रेमाने भोजनाचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली.
आळंदीत न येण्याचे वारकऱ्यांना आवाहन
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी राज्यभरातून वारकरी आळंदीत दाखल होत आहेत. मात्र सततच्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर आला असून आळंदीत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान यांनी वारकऱ्यांना सध्या आळंदीत येऊ नये, असे आवाहन केले आहे. वारकऱ्यांना आळंदीत येणे टाळावे, या निर्णयाबाबत काही वारकऱ्यांमध्ये नाराजी होती. मात्र वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत बहुतांश वारकरी या निर्णयाचे स्वागत करत आहेत.
पुण्यात वाहतुकीचे नियोजन
पुणे शहरात संतज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराममहाराज यांच्या पालखीच आगमन होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रवासांची गैरसोय टाळण्यासाठी वाहतूक नियोजन करण्यात आल आहे. गैरसोय टाळण्यासाठी पुणे वाहतूक शाखेकडून माहिती देण्यात आली आहे. अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी वारकऱ्यांना आवाहन केलं आहे.