
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड समुद्रात मच्छिमारी करून बंदरात परतत असताना “अलमका” ही पर्ससीन नौका वादळी वाऱ्याच्या तडाख्यात सापडून समुद्रात बुडाली.
या नौकेवर तांडेलासह सुमारे १५ ते २० खलाशी होते. वाऱ्याचा वाढलेला वेग आणि उंच लाटांमुळे नौकेचा तोल जाऊन ही दुर्घटना घडली.
ही घटना मिठमुंबरी ते देवगड पवनक्कीसमोरील समुद्री पट्ट्यात घडल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, संकटात सापडलेल्या खलाशांनी मदतीसाठी हाक दिल्यानंतर परिसरातील स्थानिक मच्छिमार तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बचावकार्य राबवत सर्व खलाशांना सुरक्षित किनाऱ्यावर आणण्यात यश मिळवले.
सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी संपूर्ण नौका समुद्रात बुडाल्याने कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेमुळे मच्छिमारांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे