
जळगाव विधान परिषदेची जागा भाजपच्या वाट्याला गेल्याने राज्याचे मंत्री आणि शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील प्रचंड नाराज आहेत. त्यांना मुलासाठी ही जागा हवी होती. त्यासाठी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी वारंवार चर्चाही केल्या. पण भाजपने ही जागा सोडली नाही. त्यामुळे गुलाबराव पाटील यांचं मुलाला आमदार करण्याचं स्वप्न अधुरं राहिलं. आपला मुलगा आमदार होऊ शकला नाही, याची खदखद गुलाबराव पाटील यांच्या मनात कायम राहिली आहे. त्यांनी आज ही खदखद पुन्हा एकदा बोलून दाखवली. आपल्या खास स्टाईलने, शेरोशायरी करत नसीब में होगा तो उचलकर आयेगा, नही होगा तो… असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी मनातील भावनेला वाट मोकळी करून दिली. तसेच या शायरीतून सूचक इशाराही दिला.
आपल्या मुलाला विधान परिषदेचे तिकीट न मिळाल्याने शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांनी जाहीर कार्यक्रमातून भावना बोलून दाखवल्या आहेत. अनेक लोक म्हणतात की तुम्हाला विधान परिषदेसाठी तिकीट मिळालं नाही. मात्र मी एवढेच सांगतो, नसीब मे होगा तो उचलकर आयेगा और नसीब में नही होगा तो आकर चला जायेगा, असं गुलाबराव पाटील म्हणाले. देवाच्या मनात यापेक्षाही पुढे आयुष्यात काही चांगलं होणार असेल. त्यामुळे प्रारब्धावर विश्वास ठेवा, अशा शब्दात मंत्री गुलाबराव पाटलांनी भावना बोलून दाखवल्या.
राजकारण जरूर करा…
सगळं करा, राजकारण जरूर करा, पण भगवा प्रकाशातील विचार कधी सोडू नका.. असा सल्ला देतानाच गुलाबराव पाटलाला तुम्ही आमदार केलं, मंत्री केलं म्हणून मी सामाजिक कार्य करतो आहे. तुमची सेवा करू शकतो आहे, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.
शेवटपर्यंत प्रयत्न केला पण…
मुलाला विधान परिषदेचं तिकीट मिळावं म्हणून गुलाबराव पाटील यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले. अगदी अर्ज भरायच्या घटकेपर्यंत त्यांचा प्रयत्न सुरू होता. पण भाजपने जागा सोडण्यास नकार दिल्याने गुलाबरावांच्या पदरी निराशा आली. उमेदवारी जाहीर होण्याच्या शेवटच्या मिनिटापर्यंत मंत्री गुलाबराव पाटील मुंबईत ठाण मांडून होते. तीन ते चार वेळा एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांनी मुलाला उमेदवारी देण्याची मागणी केली. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या नाराजीचा विधान परिषदेच्या महायुतीतील भाजप उमेदवाराला फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर नाराजी विरोधकांच्या पथ्यावर देखील पडण्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
मुलाला उमेदवारी न मिळाल्याने जळगावमधील भाजपच्या उमेदवाराचा अर्ज भरतेवेळी गुलाबराव पाटील गैरहजर राहिले. शिवसेनेचे आमदार जळगाव जिल्ह्यात होते. ते आणि शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी देखील उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी न आल्याने शिवसेनेत नाराजी असल्याचं उघड झालं. चिरंजीव प्रतापराव पाटील यांना तिकीट मिळावं यासाठी गुलाबराव पाटील यांचा आग्रह होता.