Headlines

बाप रे! फक्त 5 तासांत पिकवतात आंबे; राज्यात ऑपरेशन मँगोमुळे खळबळ, नक्की काय घडतंय?

बाप रे! फक्त 5 तासांत पिकवतात आंबे; राज्यात ऑपरेशन मँगोमुळे खळबळ, नक्की काय घडतंय?
बाप रे! फक्त 5 तासांत पिकवतात आंबे; राज्यात ऑपरेशन मँगोमुळे खळबळ, नक्की काय घडतंय?


उन्हाळा सुरू झाला की सर्वसामान्यांना रसाळ आंबा खाण्याचे वेध लागतात. मात्र आता हाच आंबा तुमच्या आरोग्यासाठी गोड विष ठरू लागला आहे. वाढत्या मागणीचा फायदा घेत आंब्याची कृत्रिम आवक वाढवण्यासाठी व्यापाऱ्यांकडून जीवघेणी शक्कल वापरली जात आहे. त्यामुळे आता अनेक व्यापारी हे प्रशासनाच्या रडारवर आले आहेत. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) ऑपरेशन मँगो अंतर्गत संपूर्ण राज्यात, विशेषतः मुंबई आणि उपनगरात युद्धपातळीवर तपासणी मोहीम सुरू केली आहे.

काय आहे ‘ऑपरेशन मँगो’?

आंबा नैसर्गिकरीत्या झाडावर किंवा अढीमध्ये पिकण्यासाठी ५ ते ७ दिवसांचा कालावधी लागतो. मात्र, बाजारात आंब्याला मिळणारा चांगला भाव आणि ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी व्यापारी काही तासांत आंबा पिकवण्याचे तंत्र वापरत आहेत. हे रोखण्यासाठी एफडीएने १५० विशेष पथके तैनात केली आहेत. ही पथके केवळ मुख्य बाजारपेठांवरच नाही, तर शहराबाहेरील गोदामांवरही लक्ष ठेवून आहेत.

वाशीतील एपीएमसी मार्केटमधील कारवाई

नुकतंच एफडीएकडून नवी मुंबईतील वाशी येथील एपीएमसी (APMC) फळ बाजारात छापेमारी करण्यात आली. या छाप्यात केवळ आंबेच जप्त झाले नाहीत, तर ते पिकवण्याच्या पद्धतीही समोर आल्या आहेत. सध्या बाजारात आंबे पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडचा वापर केला जात आहे. हे रसायन गॅस वेल्डिंगसाठी वापरले जाते. आंब्याच्या पेट्यांमध्ये या रसायनाच्या पुड्या ठेवल्या जातात. ज्यातून निघणारा ॲसिटिलीन वायू आंब्याचा रंग बदलतो.

अनेक ठिकाणी बागांमधूनच कच्चा आंबा काढल्यानंतर त्यावर इथिलीन स्प्रे या रसायनांचे फवारे मारले जातात. नुकत्याच केलेल्या छाप्यात अशा काही रसायनांच्या बाटल्या सापडल्या आहेत, ज्यांचे लेबलही बनावट होते. ही रसायने फळांच्या पेशींवर थेट परिणाम करून त्यांना मऊ करतात. अन्न सुरक्षा मानकांनुसार कॅल्शियम कार्बाइड पूर्णपणे प्रतिबंधित आहे. या रसायनांनी पिकवलेला आंबा ओळखणे कठीण असते कारण तो बाहेरून अतिशय पिवळाधमक आणि आकर्षक दिसतो.

मात्र, असा आंबा खाल्ल्याने मोठे परिणाम होऊ शकतात. यामुळे ग्राहकांना घशात जळजळ, उलट्या, अतिसार आणि पोटात तीव्र कळा येणे हे दुष्परिणाम होऊ शकतात. शरीरातील मज्जासंस्थेवर परिणाम होऊन स्मरणशक्ती कमी होणे, कर्करोगाचा (Cancer) धोका निर्माण होऊ शकतो.

फौजदारी गुन्हे दाखल

याप्रकरणी एफडीएचे सहआयुक्त महेश चौधरी यांनी स्पष्टपणे भाष्य केले आहे. ज्या व्यापाऱ्यांकडे अशा प्रकारे पिकवलेले आंबे सापडतील, त्यांचा परवाना रद्द करण्यासोबतच त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असे महेश चौधरी म्हणाले. सध्या वाशी, भिवंडी आणि कल्याण येथील घाऊक बाजारांमधून नमुने गोळा करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *