
भारताचा शत्रू असलेल्या चीनमध्ये मोठी उलथापालथ पहायला मिळत आहे. चीनी सरकारने एकाचवेळी अनेक वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि नेत्यांना त्यांच्या पदावरून हटवले आहे. सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआच्या वृत्तानुसार शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली आहे. या यादीमध्ये माजी वित्तीय नियामक प्रमुख ली युन्झे आणि अलीकडेच चौकशीच्या कक्षेत आलेले पोलिट ब्युरोचे सदस्य मा शिंगरुई यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, या सर्व अधिकाऱ्यांना कोणत्या कारणामुळे पदावरून हटवण्यात आले, याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
हकालपट्टीचे कारण गुलदस्त्यात
शिन्हुआ वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, चीनच्या सर्वोच्च कायदे मंडळ असलेल्या नॅशनल पीपल्स काँग्रेसने सहा लष्करी खासदारांसह दोन वरिष्ठ नेत्यांची सदस्यता रद्द केली आहे. नॅशनल पीपल्स काँग्रेस ही चीनमधील सर्वात मोठी कायदे करणारी संस्था असल्याने, त्यामधील असे बदल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. एक निवेदन जारी करत याबाबत माहिती जारी करण्यात आली असली तर या निवेदनात अधिकाऱ्यांना पदावरून हटवण्यामागील देण्यात आलेले नाही. चीनच्या संरक्षण मंत्रालयानेही यावर भाष्य केले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार अधिकाऱ्यांना पदावरून हटवण्याची ही कारवाई राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेचा एक भाग मानली जात आहे. कारण गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या मोहिमेत अनेक वरिष्ठ अधिकारी आणि उच्चपदस्थ लष्करी अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली असून, अनेकांना पदावरून हटवण्यात आले आहे. आता करण्यात आलेली ही ताजी कारवाई देखील या मोहिमेतील आणखी एक महत्त्वाची पायरी मानली जात आहे.
कोणत्या अधिकाऱ्यांची हकालपट्टी?
पदावरून हटवण्यात आलेल्या लष्करी खासदारांमध्ये जनरल शू श्युचियांग यांचे नाव सर्वात महत्त्वाचे आहे. ते सेंट्रल मिलिटरी कमिशनच्या इक्विपमेंट डेव्हलपमेंट विभागाचे प्रमुख होते. हा विभाग चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) साठी शस्त्रास्त्रे आणि लष्करी उपकरणांची निर्मिती, खरेदी आणि चाचणीची जबाबदारी सांभाळतो. याशिवाय, 2022 पासून ते चीनच्या मानवी अंतराळ कार्यक्रमाचे कमांडर-इन-चीफ म्हणूनही काम पाहत होते.
जनरल ली फेंगबियाओ, जे PLA च्या वेस्टर्न थिएटर कमांडचे राजकीय आयुक्त, त्यांनाही पदावरून हटवण्यात आले आहे. जनरल गुओ पुक्षियाओ, जे PLA हवाई दलात राजकीय आयुक्त म्हणून कार्यरत होते, त्यांनाही पदमुक्त करण्यात आले आहे. ईस्टर्न थिएटर कमांडचे वांग कांगपिंग, सायबरस्पेस फोर्सचे झांग मिंगहुआ आणि आर्मीचे यिन होंगशिंग यांनाही त्यांच्या पदांवरून हटवण्यात आले आहे. अशा प्रकारे एकूण सहा लष्करी खासदारांची सदस्यता रद्द करण्यात आली आहे.