Headlines

‘राजा शिवाजी’मधील ती भूमिका सलमान खानला का दिली? रितेश देशमुखचा खुलासा

‘राजा शिवाजी’मधील ती भूमिका सलमान खानला का दिली? रितेश देशमुखचा खुलासा
‘राजा शिवाजी’मधील ती भूमिका सलमान खानला का दिली? रितेश देशमुखचा खुलासा


रितेश देशमुख, सलमान खानImage Credit source: Instagram

अभिनेता रितेश देशमुखचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली जीवनावर आधारित हा चित्रपट फक्त त्याच्या भव्यतेमुळे नाही तर त्यातील कलाकारांमुळेही चर्चेत आला आहे. ‘राजा शिवाजी’ या चित्रपटात स्वतः रितेश देशमुख हा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत असून त्याच्यासोबत यामध्ये जिनिलिया देशमुख, अभिषेक बच्चन, संजय दत्त, बोमन इराणी, फरदीनन खान, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर यांसारख्या कलाकारांची फौजच आहे. शिवाय या चित्रपटात सुपरस्टार सलमान खानसुद्धा पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार आहे. ‘बिग बॉस मराठी 6’च्या ग्रँड फिनालेमध्ये खुद्द रितेश देशमुखने याची घोषणा केली होती. विशेष म्हणजे ‘राजा शिवाजी’मधील पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेसाठी सलमाननेच रितेशकडे आग्रह धरला होता.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सलमानसोबतच्या जुन्या मैत्रीबद्दल बोलताना रितेश म्हणाला, “राजा शिवाजी या चित्रपटासाठी खरंतर सलमानची निवड झाली नव्हती. परंतु त्याने या प्रोजेक्टचा भाग होण्यासाठी आग्रह धरला होता. जेव्हा मी ‘लय भारी’ हा चित्रपट केला, तेव्हा त्यात सलमान खान होता. तेव्हाच त्याने मला एक विनंती केली होती की, मला एक सीन करायचा आहे. त्यानंतर जेव्हा मी ‘वेड’ या चित्रपटावर काम करत होतो, तेव्हा त्याला फोन करून म्हणालो की, मला तुला भेटायचं आहे. तो म्हणाला, ठीक आहे. मी विचारलं कधी, त्यावर त्याने विचारलं की, ज्या भूमिकेसाठी तुला भेटायचं आहे ती निश्चित झाली आहे का? त्याने मला फक्त विचारलं की शूटिंग किती दिवसांचं आहे? मी म्हणालो दोन दिवस, हे ऐकून सलमानने होकार दिला होता.”

‘राजा शिवाजी’साठी मात्र कलाकारांची निवड प्रक्रिया थोडी वेगळी असल्याचं रितेशने यावेळी स्पष्ट केलं. याविषयी बोलताना तो पुढे म्हणाला की, “मी या चित्रपटासाठी सलमानशी संपर्क साधला नव्हता. आम्ही नवीन वर्षाच्या दिवशी भेटलो होतो. मला त्याने विचारलं की, मी या चित्रपटाचं शूटिंग कधी सुरू करणार आहे? तेव्हा मी त्याला म्हणालो की या महिन्यातच सुरू होत आहे. सलमान म्हणाला, मग मी कोणती भूमिका त्यात साकारतोय? जेव्हा मी सलमानला सांगितलं की माझ्याकडे त्याच्यासाठी कोणतीही भूमिका नाही, तेव्हा त्याने या प्रोजेक्टचा भाग होण्याचा आग्रह धरला. तो म्हणाला, नाही नाही नाही.. तू माझ्याशिवाय हा चित्रपट बनवू शकत नाही. मला त्यात असायलाच हवं. मग त्याच्यासाठी भूमिकेचा विचार केला आणि अशा प्रकारे तो या चित्रपटाचा भाग बनला.”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *