
कल्याणमधून चोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कल्याण पूर्व भागातील काटे मानिवली भागात वाघाची मुखवटे घालून चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे. वाघाचे मुखवटे घालून घरफोडी केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे . मुखवटे घालून चोरट्यांचं ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्व भागात असलेल्या काटे मानिवली नाका परिसरात असलेल्या एक घरफोडीची घटना घडली. तोंडावर वाघाचे मुखवटे घालून आणि हातात धारदार सुरे घेऊन कारमधून आलेल्या चोरट्यांनी बंद घर फोडलं. या चोरट्यांनी घरातून सोन्याचे दागिने लंपास केले. वाघाचे मुखवटे घातलेल्या चोरट्यांनी घरातून 2 लाख ५४ हजारांच्या किंमतीचे सोन्याचे दागिने चोरले. चोरी करताना चोरट्यांनी मुखवटे घातल्याने या चोरीची ‘ऑपरेशन टायगर’ म्हणून चर्चा सुरू झाली आहे .
कल्याण (Kalyan) पूर्व भागातील काटे मानिवली नाका परिसरात ही घटना घडली. या घटनेला एक महिना उलटून गेला आहे. आता या चोरीच्या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याने परिसरातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. परंतु पोलिसांना (Police) अद्याप चोरट्यांना पकडण्यात कोणत्याही प्रकारचं यश आलेलं नाही.
एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्या लोकप्रतिनिधीच्या प्रकाराला ‘ऑपरेशन टायगर ‘ (Operation Tiger) नाव दिले जात आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनीही या चोरीच्या प्रकाराला ‘ऑपरेशन टायगर’ हे नाव दिलं आहे. खासदार फुटीनंतर एक ‘ऑपरेशन गोल्ड’ नावाचं एका दैनिक वृत्तपत्राचं व्यंगचित्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं होतं. या व्यंगचित्रातून प्रेरणा घेऊन चोरटे देखील मुखवटे घालू लागल्याची चर्चा सुरू झाली आहे. मुखवटे घालून चोरट्यांची चोरी यशस्वी झाल्याने नागरिकांनी पोलिसांकडे कडक कारवाईची मागणी केली आहे. चोरट्यांवर कठोर कारवाई कधी करणार, असा सवाल देखील नागरिकांकडून केला जात आहे. नागरिकांच्या मागणीनंतर कोळसेवाडी पोलिसांकडून काय पावले उचलली जाताहेत, हे पाहावे लागेल.