
लांबचा प्रवास करताना किंवा दुर्गम भागात गेल्यावर मोबाईल नेटवर्कची समस्या अनेकांना होत असते. कॉल ड्रॉप होणे किंवा इंटरनेट न चालणे यामुळे संपर्कात अडचणी येतात. मात्र, तुमच्या स्मार्टफोनमधील काही साध्या सेटिंग्ज बदलून तुम्ही ही समस्या सोडवू शकता.
फ्लाईट मोडचा वापर: जर नेटवर्क अचानक गायब झाले असेल, तर फोन १५ ते २० सेकंदांसाठी फ्लाईट मोडवर टाका आणि नंतर पुन्हा सामान्य मोडवर आणा. यामुळे तुमचा फोन जवळच्या मोबाईल टॉवरशी पुन्हा नव्याने कनेक्ट होतो.
फोन रीस्टार्ट केल्याने बॅकग्राउंडमधील त्रुटी दूर होतात. डिव्हाईस पुन्हा नेटवर्क शोधण्यास सुरुवात करते. हा सर्वात प्रभावी आणि सोपा मार्ग आहे. वरील दोन्ही उपाय करूनही फरक पडत नसेल, तर सिम कार्ड काढून ते स्वच्छ करा आणि पुन्हा नीट बसवा. अनेकदा धूलिकणांमुळे सिम कार्ड आणि फोनचा संपर्क नीट होत नाही.
मॅन्युअल नेटवर्क सर्च: जर ऑटोमॅटिक नेटवर्क येत नसेल, तर फोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन Manual Network Selection निवडा. यामुळे तुमचा फोन उपलब्ध असलेल्या नेटवर्कशी थेट कनेक्ट होऊ शकतो.
बस किंवा ट्रेनने प्रवास करताना शक्यतो खिडकीजवळची सीट निवडा. यामुळे अडथळे कमी होऊन सिग्नल मिळण्यास मदत होते. रेल्वे स्टेशन किंवा सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध असलेल्या फ्री वाय-फायचा वापर करून तुम्ही वाय-फाय कॉलिंगद्वारे संपर्क साधू शकता.
तुमच्या सिम कार्डला नेटवर्क नसले तरी, आपत्कालीन परिस्थितीत तुम्ही ११२ या क्रमांकावर डायल करू शकता. हा क्रमांक उपलब्ध असलेल्या इतर कोणत्याही कंपनीच्या नेटवर्कचा वापर करून तुमचा कॉल कनेक्ट करण्यास सक्षम असतो.