शिर्डीत प्रसादाचा लाडू कमी झाला, हॉटेल बंद पडली, किमान देवासमोर तरी…; संजय राऊतांनी मोदी-फडणवीसांना घेरले

शिर्डीत प्रसादाचा लाडू कमी झाला, हॉटेल बंद पडली, किमान देवासमोर तरी…; संजय राऊतांनी मोदी-फडणवीसांना घेरले
शिर्डीत प्रसादाचा लाडू कमी झाला, हॉटेल बंद पडली, किमान देवासमोर तरी…; संजय राऊतांनी मोदी-फडणवीसांना घेरले


राज्यातील इंधन टंचाईच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध पेटले आहे. देशात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा कोणताही तुटवडा नाही, केवळ काँग्रेसकडून जाणीवपूर्वक अफवा पसरवल्या जात आहेत, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या टीकेला शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची बदनामी करणे थांबवावे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांचे समर्थन करू नये,” अशा शब्दांत संजय राऊत यांनी हल्लाबोल केला.

संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल विचारणा करण्यात आली. यावेळी त्यांनी देशातील वाढती महागाई, इंधन टंचाईमुळे देवस्थानांमधील प्रसादावर आलेली गदा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची होणारी मानहानी याला सर्वस्वी मोदी सरकार जबाबदार असल्याचा खळबळजनक आरोपही केला.

संजय राऊत काय म्हणाले?

मुळात नरेंद्र मोदींनी देशाची बदनामी करणं थांबवायला हवं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा बदनामी करणाऱ्या पंतप्रधानांचे समर्थन करु नये. गेल्या काही काळात हिंदुस्थानला जी मानहानी पत्करावी लागली आहे, त्याला सर्वस्वी जबाबदार नरेंद्र मोदी आहेत. हे फडणवीसांनाही कळतंय. संघर्ष थांबवण्याची क्षमता जर मोदींकडे असती तर इराण-इस्त्रायलमध्ये हजारो लोकांचे जे प्राण गेले ते गेले नसते. हा दोन देशातील संघर्षाला जबाबदार मोदी यांचे मालक अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

मोदींकडून अद्याप कोणतंही मत नाही

ज्या पद्धतीने बॉम्ब वर्षाव सुरु आहे. त्यावर मोदींनी तोंडातून एक शब्दही काढलेला नाही. ऑपरेशन सिंदूर सुरु असताना त्यांनी अचानक ऑपरेशन मागे घेतलं, ते ट्रम्प यांच्या दबावामुळे. ते ऑपरेशन सिंदूर जर दबावखाली थांबवू शकतात, तर मग त्यांनी हाच दबाव ट्रम्प यांच्यावर आणायला हवा होता. भारत महान देश आहे. या जगातील स्पेन, इटली, रशिया, चीन यांसारखे राष्ट्र जर मत व्यक्त करत आहेत, पण मोदींकडून अद्याप कोणतंही मत कोणतीही भूमिका व्यक्त झालेली नाही. ही अत्यंत दुर्देवाची गोष्ट आहे, असेही राऊतांनी म्हटले.

अमेरिकेने भारताबरोबर केलेला करार हीच भारताची बदनामी आहे. ज्या अत्यंत दळभ्रदी शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्या अटी भारतावर लादलेल्या आहेत, त्या अध्यक्ष ट्रम्प यांच्या दबावाखाली लादलेल्या आहेत. ट्रम्प आम्हाला सांगतात की रशियाकडून की आणखी कोणाकडून तेल खरेदी करायचं हे सांगत आहेत. पंतप्रधान मोदींना ट्रम्प परवानगी देतोय. याला सन्मान म्हणायचं की बदनामी म्हणायची. महाराष्ट्राच्या बाबतीतही काही वेगळं घडतंय असं मला वाटत नाही. पण महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेसाठी आम्ही काही बोलत नाही, असेही संजय राऊत म्हणाले.

त्यांच्यासमोर डोकं फोडून काय उपयोग आहे?

जर काँग्रेस बदनामी करतं असे हे जर म्हणत असतील तर या देशाची प्रतिमा शिखरावर पोहोचावी म्हणून मोदींनी काय केलं. तुम्ही खोटं बोलताय. आजही देशभरात एलपीजी गॅससाठी रांगा लागल्या आणि तुम्ही म्हणताय सर्व आलबेल आहे. शिर्डीतील साई संस्थानमध्ये आतापर्यंत दोन लाडू द्यायचे, आता एकच देतात. का, इंधन नाही म्हणून. किमान हे तरी मान्य करा. देवासमोर तरी खोटं बोलू नका. तिथे भक्तांना जे जेवण दिलं जायचं त्यात दोन ऐवजी आता एक चपाती दिली जाते. गॅस नाही म्हणून. या देशातील सर्वच देवस्थानमध्ये सध्या हीच परिस्थिती आहे. मुंबईतील ४० टक्के रेस्टॉरंट बंद झाली आहेत. हजारो लोकांचा रोजगार गेला. ही महाराष्ट्राची बदनामी आहे. ही राज्याच्या मुख्यमंत्र्‍यांची बदनामी आहे. ही हिंदुस्थानच्या पंतप्रधानांची बदनामी आहे. हे जर कोणाला कळत नसेल तर त्यांच्यासमोर डोकं फोडून काय उपयोग आहे? असा सवालही राऊतांनी केला.

ते देशाचे पंतप्रधान की भाजपचे

देशाच्या बदनामीबद्दल जेव्हा सत्ताबदल होईल त्या दिवशी नरेंद्र मोदींना जबाबदार धरलं जाईल. या देशाची जी बदनामी झाली आहे, या देशाची जी मानहानी झालेली आहे, या देशाची जी लूट झालेली आहे, त्याबद्दल नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जबाबदार धरलं जाईल. निवडणुका आल्या की अशी भाषण करणं हा मोदींचा छंद आहे. पण देशातल्या सामाजिक घडामोडी, महागाई, अस्थितरता आणि जगाच्या संघर्षावर मोदी बोलत नाही. ते निवडणुकांवर लक्ष देतात. ते देशाचे पंतप्रधान नाहीत की भाजपचे पंतप्रधान आहेत, असा टोलाही संजय राऊतांनी लगावला



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *