
भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या चौकशीसंदर्भातील व्हायरल पत्रावरून राज्यातील राजकारण तापले आहे. महसूल मंत्र्यांच्या स्वाक्षरीने पाठवण्यात आलेल्या या पत्रात मेहता यांचा उल्लेख ‘भूमाफिया’ म्हणून करण्यात आला होता आणि १२० कोटी रुपयांच्या शासन महसूल थकबाकीच्या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, “महसूल मंत्र्यांनी स्वतःच्याच आमदारांना भूमाफिया म्हंटल्याचे चांगले आहे, पण फक्त शब्दपुरते हे राहिले नाही, पत्रातील आदेशाची अंमलबजावणी झाली तरच महसूल मंत्र्यांना खऱ्या अर्थाने मानावे लागेल. अन्यथा, तू मारल्यासारखं मी रडल्यासारखं हाच प्रकार भाजपचे नेते करत असतात.”
दानवे यांनी पुढे टीका करत म्हटले की, भूमाफिया हा शब्द नरेंद्र मेहता यांच्यासाठी वापरला गेला, पण तो फक्त छोटा शब्द ठरतो; त्याच्या पुढचे आहेत ते, असा दानवे यांनी मेहता यांना हा टोला लगावला आणि स्पष्ट केले की, शब्दांवरून राजकारण चालणार नाही, प्रत्यक्ष कारवाई पाहिजे. या घटनेमुळे भाजप आणि शिवसेना गटांमध्ये पुन्हा एकदा राजकीय चर्चांना गती मिळाली आहे.