
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार सुरूच आहे. मुंबईसह अनेक भागात अचानक गुजराती भाषेत पाट्या लागताना दिसत आहेत. त्यामुळे मराठी माणसामध्ये तीव्र संताप उमटत आहे. आता मुंबईतील परळ येथेही रातोरात गुजराती भाषेत सूचना फलक लागले. त्यामुळे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. मराठी माणसाला डिवचण्याचा हा प्रकार असून हळूहळू मुंबईत गुजरातीचं प्राबल्य वाढवण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. तसेच हे फलक मुंबईत कुठेच लागता कामा नये. पुन्हा असा प्रकार घडला तर आंदोलन करण्याचा इशाराही शिवसैनिकांनी दिला आहे.
परळ टीटी उड्डाण पुलाची एक मार्गिका बंद करण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होऊ नये आणि चालकांनी आपली वाहनं दुसऱ्या बाजूने चालवावी यासाठी कंत्राटदाराने या ठिकाणी सूचना फलक लावले होते. विशेष म्हणजे ही सूचना इंग्रजी आणि गुजरातीत लिहिली होती. महाराष्ट्रात मराठी लिहिण्याऐवजी चक्क गुजराती आणि इंग्रजीत सूचना लिहिल्याने शिवसैनिक चांगलेच संतापले. शिवसैनिकांनी याप्रकरणी कंत्राटदाराला जाब विचारला. त्यामुळे कंत्राटदाराची बोबडीच वळली होती.
मुंबईत गुजराती फलक लावताच कसे ?
शिवसेनेचे स्थानिक शाखाप्रमुख मिनार नाटळकर यांनी याबाबतची माहिती दिली. परेल टीटी उड्डाणपुलाची एक लेन बंद करून काम सुरू आहे. याठिकाणी गुजरातीत सूचना फलक लावण्यात आला होता. काल मी तो काढायला सांगितला. परंतु मुंबईत गुजराती फलक लागतातच कसे काय? हा आमचा सवाल आहे. हे काय गुजरात आहे का? या राज्याची भाषा कोणती आहे हे कंत्राटदाराला माहीत नाही का? असा संतप्त सवाल मिनार नाटळकर यांनी केला.
पालिका अधिकारीही जबाबदार
मुंबई महापालिका उड्डाणपुलाचं काम करत आहे. महापालिकेतच हा कारभार असेल तर कुणाकडे दाद मागायची? या प्रकाराला एकटा कंत्राटदार जबाबदार नाही. तर मुंबई महापालिकेचे अधिकारीही त्याला तेवढेच जबाबदार आहेत. कोणत्या भाषेत फलक लावले गेलेत हे पाहण्याची जबाबदारी कुणाची आहे? असा सवाल करतानाच संबंधित कंत्राटदार गुजराती आहे की नाही माहीत नाही, पण त्याच्यावर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी नाटळकर यांनी केली.