
मागच्या आठवड्यात ठाकरे गटाचे सहा खासदार फुटले. काल सचिन अहिर यांच्या रुपाने विधान परिषदेतील एक आमदार फुटला. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या परखड शैलीत भाष्य केलं. ऑपरेशन टायगरवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी फुटलेल्यांच्या जिव्हारी लागेल असं उत्तर दिलं. “प्रश्न विकत घेणाऱ्यांचा नाहीय, विकले जाणाऱ्यांचा आहे. देहविक्रीला समजा हे तयारच असतील, तर गिऱ्हाईक आहेतच. जे राजकारण चालू आहे ते खूप घाणेरडं आहे. कुठल्या पद्धतीचं हे राजकारण सुरु आहे. मला वाटतं लोकांमध्ये या बद्दल प्रचंड संताप आहे” असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.
“पत्त्यांचा बंगला करायचो ना आपण तसा हा उलटा आहे. खालचा पत्ता मोदींचा आहे. तो सटकला की तो पडणार. जे काही टिकून आहे ते मोदींवर आहे. बाकीच्यांवर नाही. अशा गोष्टीत भयानक राजकारण करत आहेत. हे त्यांच्याही अंगाला येणारं आहे. हे कुणासाठी सुरू आहे. कोण करतंय या मागे. हे सर्व अमित शाह यांचं राजकारण सुरू आहे” असा आरोप राज ठाकरे यांनी केला.
फुटणारे भाजपमध्ये का नाही गेले?
“मागे माझ्या भाषणात म्हटलं. शिवसेनेचे सहा खासदार फोडले. भाजपमध्ये का नाही गेले. टीएमसीचे 22 खासदार फुटले. वेगळा गट का केला?. उद्या जर मला पंतप्रधान पदावर दावा सांगायचा असेल तर आतून विरोध झाल्यावर बाहेरून लोक पाठिंबा देतील. दुसऱ्याने दावा केला तर मी उभे केलेल्यांपैकी कोणी सपोर्ट करणार नाही. समोरचे विरोधक संपवता तेव्हा तुमच्यात दुश्मन तयार होतात. हे चित्र राज्यात आणि देशात दिसेल. अगदी खालपर्यंत दिसेल. बेधुंद सत्ता आल्यावर लोक असे वागतात” अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
राज ठाकरेंनी काय खंत बोलून दाखवली?
“मी अनेक वर्ष शहर कसं उभं राहतं? कसं उभं राहिलं पाहिजे यावर मी अनेकदा बोललो आहे. शहराच्या उभारणीकडे कुणाचं लक्ष नाही. फक्त बिल्डरला प्लॉट विकणं, त्यातून पैसे आणि त्यातून राजकारण सुरू आहे. लोकांना आयुष्य चांगलं मिळावं याकडे लक्ष नाही. नुसते रस्ते आणि पुलं याने विकास होत नाही. आपल्याकडे डेव्हल्पमेंट प्लान येतो. पण टाऊन प्लान नाही. फोडाफोडीचं राजकारण आहे. पैशाचं राजकारण सुरू आहे. एवढंच सुरू आहे. निवडणुका निवडणुका सुरू आहे. लोकांकडे कुणाचं लक्ष नाही” अशी खंत राज ठाकरेंनी बोलून दाखवली.