
पुण्यात अचानक अवकाळी पावसाने जोर धरला असून शहरातील विविध भागांत जोरदार पावसाची नोंद झाली आहे. ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा आणि दाट ढगांमुळे वातावरण पूर्णतः अंधारमय झाले आहे. दुपारी तीन वाजल्यानंतरही संध्याकाळसारखी परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या अर्ध्या तासापासून शहरात पावसाचा जोर कायम असून, अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाल्याचेही समोर येत आहे. दरम्यान, हवामान विभागाने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून, त्याचा परिणाम म्हणून हा अवकाळी पाऊस होत असल्याचे सांगितले जात आहे. या पावसाचा फटका ग्रामीण भागालाही बसण्याची शक्यता आहे. सध्या गहू आणि हरभऱ्याची काढणी सुरू असताना अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.