
टीना अंबानी आणि त्यांची मोठी बहीण झरनाImage Credit source: Instagram
अभिनेत्री आणि बिझनेसमन अनिल अंबानी यांची पत्नी टीना अंबानी यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. टीन अंबानी यांची मोठी बहीण झरना यांचं निधन झालं आहे. सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहित त्यांनी बहिणीच्या आठवणींना उजाळा दिल आहे. या पोस्टमध्ये त्यांनी बहिणीसोबतचे काही फोटोसुद्धा शेअर केले आहेत. टीना अंबानी यांच्यासाठी त्यांची मोठी बहीण दुसऱ्या आईसमान होती. त्यांनीच टीना यांचं कन्यादान केलं होतं. आईसमान बहिणीला गमावल्याने टीना पूर्णपणे खचल्या आहेत. “ती आमच्या विश्वातील एक तेजस्वी चेहरा होती. तिची साथ नेहमीच प्रेमाने भरलेली असायची. आम्हा सर्व बहिणींसाठी, आमच्या मुलांसाठी आणि आमच्या नातवंडंसाठी ती एक प्रेरणा होती. ती सर्वांची लाडकी होती”, अशा शब्दांत टीना अंबानी व्यक्त झाल्या आहेत.
टीना अंबानी यांची पोस्ट-
‘माझी मोठी बहीण झरना. माझी दुसरी आई.. जिने मोठ्या मनाने माझं कन्यादान केलं आणि मला माझ्या नव्या कुटुंबाकडे सोपवलं. त्याच वेळी मी माझ्या मूळ कुटुंबाचा अविभाज्य भाग राहीन याचीही खात्री केली. आमच्या विश्वाचं एक तेजस्वी केंद्र, जिची मिठी नेहमीच गोड वाटायची. तिची शालीनता, माया आणि अथांग ऊर्जा ही आम्हा बहिणींसाठी, आमच्या मुलांसाठी आणि नातवंडांसाठी एक प्रेरणास्थान आहे. ओम शांती, माझी जिया. तू आमच्या आयुष्यात कधीही भरून न निघणारी पोकळी सोडून गेलीस. तुझं प्रेम आमच्यासोबत कायम राहील’, अशी भावूक पोस्ट त्यांनी लिहिली आहे.
टीना अंबानी यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्यांच्या बहिणीला श्रद्धांजली वाहिली आहे. या कठीण काळात धीराने राहण्याचा सल्ला नेटकऱ्यांनी टीना यांना दिला आहे. टीना यांचं त्यांच्या सर्व बहिणींवर खूप प्रेम आहे आणि अनेकदा त्यांच्यासोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत त्या आपलं प्रेम व्यक्त करत असतात.
टीना अंबानी यांनी 1978 मध्ये ‘देस परदेस’ या चित्रपटातून अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यांनी ‘कर्ज’, ‘आपके दिवाने’, ‘रॉकी’, ‘पुकार’ आणि ‘मुकद्दर का फैसला’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. मात्र लग्नानंतर त्यांनी अभिनयक्षेत्रात काम करणं सोडलं. 1991 मध्ये त्यांनी उद्योगपती अनिल अंबानी यांच्याशी लग्न केलंय. या दोघांना दोन मुलं आहेत.