
पेटीएम पेमेंट्स बँकेला भारतीय रिझर्व्ह बँकेने मोठा दणका दिला आहे. RBI ने आज मोठा निर्णय घेत पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडचा बँकिंग परवाना रद्द केला आहे. RBI ने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, आता पेटीएम पेमेंट्स बँक बँकिंग रेग्युलेशन कायद्याअंतर्गत कोणत्याही प्रकारचे बँकिंग काम करू शकणार नाही. याचा अर्थ असा की, ही बँक आता नवीन किंवा विद्यमान ग्राहकांना नियमित बँकिंग सेवा देऊ शकणार नाही. यामुळे आता बँकेच्या ग्राहकांनाही फटका बसण्याची शक्यता आहे.
परवाना रद्द का झाला?
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार पेटीएम पेमेंट्स बँकेचे कामकाज आणि व्यवस्थापन हे सामान्य जनतेच्या हिताचे नव्हते. तसेच बँकेने आपल्या पेमेंट्स बँक परवान्याशी संबंधित अनेक अटींचे योग्य प्रकारे पालन केले नाही त्यामुळे परवाना रद्द करण्यात आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार RBI ने यापूर्वीही या बँकेवर कठोर कारवाई केली होती. 11 मार्च 2022 पासून बँकेला नवीन ग्राहक जोडण्यास बंदी घालण्यात आली होती. यानंतर बँकेवर अनेक निर्बंध लावण्यात आले होते, जसे की खात्यात पैसे जमा करणे, क्रेडिट करणे आणि वॉलेटमध्ये टॉप-अप करण्यावरही बंदी घालण्यात आली होती.
हायकोर्टात जाण्याची तयारी
RBI ने आपल्या निवेदनात असेही म्हटले आहे की, बँक पूर्णपणे बंद करण्यासाठी आम्ही हायकोर्टात अर्ज दाखल करणार आहेत. याचा अर्थ येत्या काळात बँकेचे अस्तित्व पूर्णपणे संपुष्टात येऊ शकते. ही प्रक्रिया कायदेशीर पद्धतीने पूर्ण केली जाईल, जेणेकरून सर्व नियमांचे पालन होईल.
शेअर बाजारावरही परिणाम
पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द केल्याचा परिणाम शेअर बाजारातही दिसून आला. पेटीएमचे शेअर्स हलक्या घसरणीसह 1,153 रुपयांवर बंद झाले. जरी ही घसरण मोठी नसली तरी गुंतवणूकदारांमध्ये अनिश्चितता वाढली आहे. त्यामुळे आगामी काळात कंपनीला आणखी आर्थिक फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ग्राहकांसाठी पुढचा मार्ग काय?
आरबीआयने बँकेचा परवाना रद्द केल्यानंतर आता समोर प्रश्न उपस्थित राहत आहे की, ग्राहकांचे पैसे सुरक्षित राहतील का? महत्त्वाची बाब म्हणजे अशा प्रकरणांमध्ये RBI ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करते. आता ग्राहकांना अधिकृत माहितीकडे लक्ष ठेवण्याचा आणि घाबरण्याऐवजी योग्य निर्णय घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.