
मागच्या अनेक दिवसांपासून जी चर्चा होती ती अखेर खरी ठरली आहे. प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांना शिवसेनेकडून विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र विधान परिषदेची दुसरी जागा कोणाला मिळेल याबाबत सस्पेन्स कायम होता. अखेर शिंदेंनी दुसऱ्या जागेवर नीलम गोऱ्हे असणार असं सांगितलं आहे. याशिवाय त्यांनी नीलम गोऱ्हेंनाच का जागा दिली याबाबतही सांगितलं.
एकनाथ शिंदे म्हणाले, “एक आमचे एक उमेदवार बच्चू कडू आणि दुसऱ्या नीलम ताई गोऱ्हे आहेत. या दोघांचे अर्ज आता थोड्या वेळेतच आम्ही भरू.” नीलम गोऱ्हे यांचे नाव यावेळी विधान परिषदेवर घेण्यामागे नेमकं कारण काय हेही यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. ते म्हणाले, “नीलम गोऱ्हे यांचा अनेक विकासकामांमध्ये सहभाग आहे. कुठेही महिलांवर अत्याचार, अन्याय होत असेल तर त्या धावून जातात. महत्त्वाची बाब म्हणजे उपसभापती म्हणूनही त्यांनी अनेक वर्षे योगदान दिलं होतं,’ अर्थातच या जागेसाठी गोऱ्हे योग्य असल्याचं शिंदेंनी स्पष्ट केलं.