Headlines

CNG Price Hike: रिक्षा-टॅक्सी प्रवास महागणार? CNG च्या दरात अचानक मोठी वाढ; नवे दर काय?

CNG Price Hike: रिक्षा-टॅक्सी प्रवास महागणार? CNG च्या दरात अचानक मोठी वाढ; नवे दर काय?
CNG Price Hike: रिक्षा-टॅक्सी प्रवास महागणार? CNG च्या दरात अचानक मोठी वाढ; नवे दर काय?


राज्यात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने चांदी, किराणा सामान, दूध यांची दरवाढ होत असताना दुसरीकडे आता मुंबई आणि उपनगरातील लाखो वाहनधारकांना महागाईचा मोठा फटका बसणार आहे. महानगर गॅस लिमिटेडने (MGL) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. या निर्णयामुळे मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) मध्यमवर्गीय वाहनचालक, रिक्षा आणि टॅक्सी चालकांचे आर्थिक गणित कोलमडण्याची शक्यता आहे.

नवे दर काय?

सुधारित दरानुसार, मुंबईत आता सीएनजी ८४ रुपये प्रति किलो या दराने मिळणार आहे. ही दरवाढ काल १३ मे २०२६ च्या मध्यरात्रीपासून लागू झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सीएनजीचे दर स्थिर होते. मात्र आता अचानक दरांमध्ये अचानक झालेली ही वाढ वाहनचालकांसाठी अनपेक्षित ठरली आहे.

दरवाढीमागील जागतिक आणि आर्थिक पेच

एमजीएलने अधिकृत निवेदनात दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, ही दरवाढ केवळ स्थानिक कारणांमुळे नसून हा जागतिक स्तरावरील अस्थिरतेचा परिणाम आहे. गेल्या काही महिन्यांपासून पश्चिम आशियातील देशांमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. तसेच इराण आणि आसपासच्या देशांमधील वाढत्या तणावामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा साखळीत अडथळे निर्माण झाले आहेत. देशांतर्गत गॅस उत्पादनापेक्षा महागड्या आयातीवर अवलंबून राहावे लागत असल्याने उत्पादन खर्च वाढला आहे.

तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचे झालेले अवमूल्यन यामुळे गॅस खरेदीसाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत. यामुळे वाहतूक क्षेत्रावर मोठे परिणाम पाहायला मिळणार आहेत.

रिक्षा-टॅक्सीचे भाडे वाढणार?

मुंबईची लाईफलाईन असलेल्या वाहतूक व्यवस्थेवर याचे परिणाम होणार आहेत. मुंबईत साधारणपणे ४.७० लाख ऑटोरिक्षा आणि १.६० लाख टॅक्सी चालतात. रिक्षा युनियनच्या मते, या वाढीमुळे ऑटोरिक्षाचा परिचालन खर्च प्रति किलोमीटर ₹१.०३ ने वाढला आहे. त्यामुळे आता लवकरच रिक्षा आणि टॅक्सीच्या किमान भाड्यात (Minimum Fare) वाढ करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. मुंबईची ‘बेस्ट’ सेवा आणि राज्य परिवहनच्या (ST) अनेक बसेस सीएनजीवर चालतात. इंधन दरवाढीमुळे या सार्वजनिक उपक्रमांच्या तोट्यात भर पडण्याची भीती व्यक्त होत आहे.

मुंबईत ५ लाखांहून अधिक खाजगी कार सीएनजीवर चालतात. पेट्रोलच्या वाढत्या किमतींना पर्याय म्हणून सीएनजीकडे वळलेल्या मध्यमवर्गीयांना आता वाढीव खर्चाचा सामना करावा लागेल. दरम्यान दर वाढले असले तरी, एमजीएलने असा दावा केला आहे की सीएनजी हा अजूनही पेट्रोल आणि डिझेलपेक्षा किफायतशीर आहे. सध्याच्या बाजारभावानुसार पेट्रोलच्या तुलनेत ४४ टक्के बचत आणि डिझेलच्या तुलनेत ७ टक्के बचत होत आहे. मात्र, वारंवार होणाऱ्या या दरवाढीमुळे स्वस्त इंधन म्हणून सीएनजीची असलेली ओळख पुसली जात असल्याची भावना सामान्य नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *