
NEET paper leak case : देशातील सर्वात मोठी मेडिकल परीक्षा नीट यूजी पेपर लीक प्रकरणात सीबीआयने धाडसत्र सुरू केलं आहे. सीबीआयने या प्रकरणाचे पाळंमुळं खणून काढायला सुरुवात केली आहे. राजस्थानपासून ते महाराष्ट्रापर्यंत या प्रकरणाचे जाळे पसरले आहे. महाराष्ट्रात तर सीबीआयने तिसऱ्या आरोपीला अटक केली आहे. ही आरोपी एक महिला आहे. या महिलेला अटक केल्यानंतर सीबीआयलाही तिची हायप्रोफाईल लाइफस्टाईल आणि बँक ट्रँजेक्शन पाहून धक्का बसला. पकडण्यात आलेली महिला ही काही सराईत गुन्हेगार नाही. पण समाजातील एका उच्चभ्रू वर्गातून आलेली आहे. त्यामुळेच तिचं कृत्य पाहून सीबीआयला धक्का बसला आहे.
मनिषा वाघमारे असं या महिलेचं नाव आहे. सीबीआयने तिची संपूर्ण कुंडलीच समोर मांडली आहे. ही महिला पेशाने ब्यूटिशियन आहे. पण ब्यूटिशियनच्या आडून ती पुण्यात मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी ती कौन्सिलिंग आणि अॅडमिशन कन्सल्टन्सी चालवत होती. विशेष म्हणजे या महिलेचा नवरा डेंटिस्ट आहे. त्यांचं पुण्यात स्वत:चं क्लिनिक आहे.
कॉल रेकॉर्डसने घात…
सीबीआयला मनिषा वाघमारे आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी लोखंडे यांच्या कॉल डिटेल रेकॉर्डमधून सबळ पुरावे मिळाले. या रेकॉर्डनुसार, हे दोघेही 3 मे रोजी झालेल्या नीट परीक्षाच्या आधी आणि नंतर सातत्याने एकमेकांच्या संपर्कात होते. खैरनार नावाच्या आरोपीने यश यादव नावाच्या विद्यार्थ्याला नीटचा गेस पेपर दिला त्यावेळीही वाघमारे आणि लोखंडे एकमेंच्या संपर्कात अधिकच आले होते. त्यानंतर हा पेपर राजस्थानातील बिवाल कुटुंबातील सदस्यांना देण्यात आला होता. या संपूर्ण लिंकमध्ये मनीषा वाघमारेची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती.
खात्यातील पैशामुळे रडारवर
मनीषा वाघमारेची हिस्ट्री शोधून काढल्यावर सीबीआयला मोठ्या प्रमाणात खात्यातील आवाकजावक आढळून आली. नीट परीक्षेच्या आधी आणि नंतर तिच्या खात्यात देशातील वेगवेगळ्या भागातून अचानक मोठी रक्कम आली होती. सुरुवातीच्या तपासात सीबीआयला 20 लाखांचे व्यवहार सापडले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषा वाघमारेच्या खात्यात पैसे पाठवणारे सर्व विद्यार्थी आणि त्यांचे नातेवाईक हे दुसऱ्या राज्यातील आहे. दुसऱ्या राज्यातूनच तिच्या खात्यात हा पैसा आला आहे. अशा 21 खात्यांची माहिती समोर आली आहे. त्यामुळेच हे सर्व खाते आता सीबीआयच्या रडारवर आले आहेत.
तिला वाटलं पुरावे नष्ट होतील
कारवाईच्या भीतीने मनिषा वाघमारे आणि लोखंडे यांनी त्यांच्या मोबाईलमधील महत्त्वाचे मेसेज आणि चॅट्स डीलिट केल्या. पण सीबीआयने त्वरीत अटक करून मनिषा आणि इतर आरोपींचे मोबाईल जप्त केले आहेत. हे मोबाईल डेटा रिकव्हरीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवले आहेत. हे सर्व आरोपी सिंडिकेट पद्धतीने काम करत असल्याचंही सीबीआय तपासातून समोर आलं आहे.