
राज्यातील राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’नंतर आता कथित ‘ऑपरेशन तुतारी’च्या चर्चांना वेग आला आहे. विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामाचे केलेले कौतुक, तसेच दोन्ही नेत्यांची एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या कथित भेटीमुळे विविध राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट)चे आमदार संजय गायकवाड यांनी या चर्चांवर प्रतिक्रिया देत कोणत्याही राजकीय घडामोडींचे संकेत नसल्याचे स्पष्ट केले. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “असं काहीही नाही. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामाचं कौतुक संपूर्ण महाराष्ट्र करत आहे. विविध पक्षांचे आमदारही त्यांच्या कामाचं अभिनंदन करत आहेत.”
गायकवाड यांनी पुढे सांगितले की, महसूल विभागात बावनकुळे यांनी अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत. “रेव्हेन्यू विभागातील अनेक जुने कायदे बदलले, शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी निर्णय घेतले, सातबारा नोंदींसह अनेक प्रलंबित प्रश्न सोडवण्याचे काम केले. त्यामुळे त्यांच्या कामाचं कौतुक होत आहे. त्याचा कोणत्याही राजकीय समीकरणाशी संबंध जोडण्याचं कारण नाही,” असे ते म्हणाले.
‘ऑपरेशन तुतारी’च्या चर्चांबाबत विचारले असता गायकवाड म्हणाले, “तुतारीशी जवळीक वाढत आहे किंवा प्रवेश होणार आहे, असं मला वाटत नाही. जोपर्यंत शरद पवार सक्रिय आहेत, तोपर्यंत अशा प्रकारची कोणतीही राजकीय घडामोड होण्याची शक्यता नाही.”
दरम्यान, विधानसभेतील कौतुकाची देवाणघेवाण आणि कथित भेटीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले असले, तरी याबाबत कोणतीही अधिकृत भूमिका किंवा पुष्टी अद्याप समोर आलेली नाही.