
जगभरात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ‘कान्स चित्रपट महोत्सवा’त (Cannes Film Festival) यंदा मराठी पाऊल पडलं आहे. भारतीय सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांनी वयाच्या ७८ व्या वर्षी पत्नी आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्यासोबत यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पदार्पण केलं. यावेळी अभिनेत्री प्राजक्ता माळी, युट्यूबर अंकिता वालावलकर, पॉडकास्टर जयंती वाघधरे, निर्माते केदार जोशी यांसारख्या मराठी कलाकारांनी मराठी मनोरंजन प्रतिनिधी मंडळाचं प्रतिनिधित्व केलं. या ऐतिहासिक सोहळ्यात ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून प्रसिद्ध असलेली सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकरने देखील हजेरी लावली होती.
कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरने नुकतंच फ्रान्सच्या जागतिक मंचावर मराठी मातीचं प्रतिनिधित्व केले आहे. यावेळी तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत तिचे अनुभव सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये तिने कान्स चित्रपट महोत्सवातील रेड कार्पेटचे फोटो पोस्ट केले आहेत. यावेळी तिने मागचे ६ दिवस मी अशोक सर आणि निवेदिता मॅम यांच्यासोबत घालवले, माझ्यासाठी हाच खरा रेड कार्पेट होता, असे म्हटले आहे.
अंकिता वालावालकर काय म्हणाली?
मागचे ६ दिवस मी Ashok Sir आणि Nivedita Mam यांच्यासोबत घालवले. मस्ती, मजा, एकत्र breakfast, एकत्र dinner…माझ्यासाठी हाच खरा red carpet होता. ज्या माणसांना महाराष्ट्र मनापासून पूजतो, अशा व्यक्तींसोबत इतका वेळ घालवायला मिळणं, त्यांच्याकडून शिकायला मिळणं… यापेक्षा मोठं भाग्य अजून काय असू शकतं?
एक उत्तम बायको, एक समजूतदार साथीदार आणि एक सुंदर माणूस कसं असावं…हे मी Nivedita Mam यांना पाहून शिकले …मोठेपणा प्रसिद्धीत नसतो, तर आपल्या माणसांना जपण्यात असतो…आणि ते त्यांच्याकडे मनापासून आहे. रेड कार्पेट चा व्हीडीओ त्यांचा नीट बघाल तर जाणवेल की अशोक सरांचा हाथ पकडून त्यांचा पाय कुठे अडखळू नये हे बघत त्यांनी walk केलाय…त्यांच्यातली शांतता, आपुलकी, काळजी, आणि कायम सोबत उभं राहण्याची पद्धत खूप काही शिकवून गेली. खरंच… मी धन्य झाले, असे अंकिता वालावालकरने म्हटले आहे.
यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये मराठी मनोरंजन प्रतिनिधी मंडळाने आपला सांस्कृतिक वारसा आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या अभिमानाने साजरा केला. या मंडळात अशोक सराफ, निवेदिता सराफ यांच्यासह लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी, युट्यूबर अंकिता वालावलकर, पॉडकास्टर जयंती वाघधरे आणि निर्माते केदार जोशी यांसारखे मराठी कलाकार झळकले. या सर्व कलाकारांनी ‘इंडियन पॅव्हेलियन’शी संबंधित विविध उपक्रमांमध्ये सक्रिय भाग घेतला.
रविवारी १७ मे रोजी झालेल्या रेड कार्पेट वॉकदरम्यान सर्वांनी पारंपरिक महाराष्ट्रीयन पोशाख परिधान केला होता. यावेळी अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या पारंपरिक शैलीने आणि ग्लॅमरस लूकने सोशल मीडियावर तुफान लोकप्रियता मिळवली. जगभरातील चाहत्यांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.