
शेती मशागतीसाठी रोज 100 लिटरपर्यंत डिझेलImage Credit source: टीव्ही ९ मराठी
ज्ञानेश्वर मुंडे, टीव्ही ९ मराठी, प्रतिनिधी: राज्यातील अनेक जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याने नागरिक हैराण झाले आहेत. विशेषतः शेतकऱ्यांना डिझेल मिळत नसल्याने शेतीची कामं खोळंबली आहे. टॅक्टर, शेती पंप यासह इतर कामासाठी डिझेलची गरज आहे. पण डिझेलच्या तुटवड्यामुळे संकट ओढावले आहे. त्यातच बुलढाणा जिल्ह्यातील एका पेट्रोल पंपावर डिझेल येताच शेतकऱ्यांची एकच गर्दी उसळल्याचे चित्र विदारक होते. या ठिकाणी अनेक जण ठेचाळलेत तर काही जण तोंडावर पडल्याचे दिसून येते. या सर्व घटनांची दखल घेत आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना रोजच्या शेती मशागतीसाठी डिझेलचा पुरवठा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
शेती मशागतीसाठी रोज 100 लिटरपर्यंत डिझेल
शेतकऱ्यांना दररोज शेती मशागतीच्या कामासाठी 100 लिटर पर्यंत पेट्रोल डिझेल उपलब्ध करून देण्याचा आदेश पुरवठा विभागाने परभणीमध्ये (Supply Department orders to provide Diesel)दिला आहे. पूर्व मशागत आणि शेती कामांची अडचण बघता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुरवठा विभागाने आदेश काढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकरी अनेक ठिकाणी रात्र जागून पेट्रोलपंपावर रांगेत उभे ठाकले आहे. शेतीच्या कामांचा खोळंबा त्यामुळे झाला आहे. आता नवीन आदेशाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आधार कार्ड, सातबारा दाखवावे लागेल
रोज शेती मशागतीच्या कामासाठी 100 लिटर पर्यंत पेट्रोल डिझेल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पण त्यासाठी काही अटींची पूर्तता करावी लागणार आहे. पेट्रोल पंपवर आधार कार्ड सातबारा दाखवल्यास शेतकर्यांना शंभर लिटर पर्यंत पेट्रोल डिझेल उपलब्ध करून देण्याचे आदेश पुरवठा विभागाने दिला आहे. पेट्रोलियम नियम आणि मानकानुसार जाड प्लास्टिक किंवा धातूच्या कॅन मध्ये इंधन उपलब्ध करून देण्याचे आदेशही पुरवठा विभागाने दिले आहेत. तर प्लास्टिकच्या बॉटल मध्ये पेट्रोल डिझेल दिल्यास कारवाई होणार आहे.
डिझेलसाठी शेतकरी रात्रभरापासून पेट्रोल पंपावर मुक्कामी, पंप मालकाकडून चहा पाण्याची व्यवस्था
वाशिम जिल्ह्यात डिझल साठी शेतकऱ्यांना अनेक पेट्रोल पंपावर रात्री मुक्काम करण्याची वेळ आली असून शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होतेय त्यामुळे शहरातील जाधव पेट्रोल पंपावर पंप मालकाकडून रात्रभर मुक्कामी थांबलेल्या शेतकऱ्यांना सकाळी चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आलीये त्यामुळे शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी डिझेलसाठी मात्र शेतकऱ्यांची भटकंती कायम असल्याचं चित्र दिसून येत आहे.
जळगाव शहरात सलग तिसर्या दिवशी पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या रांगा कायम
जळगाव शहरातील मोहाडी रोड परिसरातील पेट्रोल पंपावर कॅन घेऊन सकाळपासूनच ग्रामीण भागातले शेतकरी रांगेमध्ये थांबून आहेत. दुसरीकडे चार चाकी वाहनांच्या देखील पेट्रोल पंप बाहेर भल्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनानंतरही नागरिकांची पेट्रोल पंपावर मोठी गर्दी कायम आहे. नागरिकांनी भीती बाळगू नये जिल्ह्यात पुरेसा पेट्रोल डिझेलचा साठा असल्या बाबत तसेच गरजे व्यतिरिक्त नागरिकांनी पेट्रोल डिझेल खरेदी करू नये जिल्हाधिकाऱ्यांनी आवाहन केलं होतं. कॅन मध्ये पेट्रोल देऊ नये असे पुरवठा अधिकाऱ्यांचे आदेश असताना देखील पंपचालकांकडून डिझेल दिलं जात आहे.