
धर्मेंद्र यांच्या लेकीची भावूक पोस्टImage Credit source: social media
सोमवार, 25 मे रोजी दिवंगत, ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील शानदार योगदानासाठी मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्याची दुसरी पत्नी, अभिनेत्री हेमा मालिनी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी धर्मेंद्र व हेमा मालिनी यांची दुसरी लेक आहना देखील उपस्थित होती. वडिलांचा या पुरस्काराने झालेला सन्मान पाहून तिच्या डोळ्यांतही अश्रू तरळले. पण आहना हिची मोठ बहीण, धर्मेंद्र यांची मोठी लेक इशा देओरे यावेळी उपस्थित राहू शकली नाही. मात्र आता तिने शोल मीडियावर एक पोस्ट शेअर करून आपल्या भवान व्यक्त केल्या. तिची ही पोस्ट वाचून कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल. चाहत्यांनी इशाची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात लाईक केली.
देओल कुटुंबीय सोहळ्याला अनुपस्थित
काल, म्हणजेच सोमवार 25 मे रोजी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले. या कार्यक्रमाला हेमा मालिनी आणि त्यांची मुलगी अहना उपस्थित होत्या. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबातील इतर सदस्य यावेळी अनुपस्थित होते. धर्मेंद्र यांची मुलं, सनी देओल आणि बॉबी देओल हे यावेळूी उपस्थित राहतील अशी चाहत्यांना आशा होती, पण ते आलेच नाहीत. या कार्यक्रमानंतर हेमा मालिनी यांनी माध्यमांशी संवाद साधला. “माझ्यासाठी हा एक अत्यंत भावनिक क्षण आहे. अहना माझ्यासोबत आहे, खरंतर ईशालाही ( या कार्यक्रमासाठी) यायचं होतं पण काही कारणामुळे ती येऊ शकली नाही. संपूर्ण कुटुंब या आनंदात सहभागी आहे. सनी, बॉबी आणि सर्वांना या सन्मानाची जाणीव आहे आणि हा आम्हा सर्वांसाठी अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे ,” अशी प्रतिक्रिया पुरस्कार स्वीकारल्यानंतर हेमा मालिनी यांनी दिली.
इशा देओल हिची भावूक पोस्ट
दरम्यान धर्मेंद्र यांची लेक, अभिनेत्री इशा देओलने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. “हा अभिमान आणि भावनांनी भरलेला क्षण आहे. आज ते आपल्यासोबत असते तर.. त्यांचा आवडता पांढरा शर्ट आणि निळ्या सूटमध्ये नेहमीप्रमाणेच अतिशय देखणे दिसले असते. हा प्रतिष्ठित सन्मान स्वीकारण्यासाठी एखाद्या लहान मुलाच्या उत्साहाने पुढे गेले असते.” असं इशाने लिहीलं.
“काल, जेव्हा माझ्या आईने आमच्या कुटुंबाच्या वतीने हा सन्मान स्वीकारला, तेव्हा आम्हा सहा भावंडांच्या वतीने सर्वात लहान असलेली अहाना उभी राहिली आणि तिने आपल्या अश्रूंनी व टाळ्यांच्या गजराने बाबांचा सन्मान केला,” अशा शब्दांत इशाने तिच्या भावना मांडल्या. ” त्यांच्यावर आमचं जीवापाड प्रेम होतं, आम्हाला त्यांची प्रत्येक क्षणी आठवण येते, आणि आम्हाला नेहमीच त्यांचा अभिमान वाटेल. आमचे बाबा, आमच्या हृदयात कायम जिवंत राहतील”असंही इशाने पुढे या पोस्टमध्ये लिहीलं. तिची ही भाविनक पोस्ट हजारो चाहत्यांनी लाईक केली.
2012 साली मिळाला होता पद्म भूषण
गेल्या वर्षी, नोव्हेंबर 2025 मध्ये धर्मेंद्र यांचं मुंबईतील राहत्या घरी निधन झालं. ते बॉलीवूडचे ‘ही-मॅन’ म्हणून प्रसिद्ध होते. जवळपास 300 चित्रपटांमध्ये काम करून धर्मेंद्र यांनी भारतीय चित्रपटसृष्टीवर आपली अमिट छाप सोडली. विशेष म्हणजे, धर्मेंद्र यांना 2012 मध्ये पद्मभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. तर यंदा त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं.