
पुणे येथील पिंपरी-चिंचवड येथील फुगेवाडी आणि हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत विषारी दारु प्यायल्याने १८ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात १२ हून अधिकारी आणि कर्मचारी निलंबित झाल्यानंतर आता अन्न आणि औषध प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाला जाग आली आहे. विविध ठिकाणी धाडी टाकून मिथेनॉलचा साठा आणि केमिकल्स जप्त करण्यात आले आहे. आरोपी योगेश वानखेडे याने मिथेनॉल मिश्रित ८४० लिटर दारु तयार केली होती. त्यातील २०० लिटर दारुची विक्री झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. तसेच योगेश वानखेडे याने दारु बनवताना योगेश वानखेडे याला इथेनॉल मिक्स करायचे होते. परंतू त्याने मिथेनॉल मिक्स केल्याचे उघड झाले आहे.
पुणे येथील विषारी दारु मृत्यू प्रकरणात आरोपी योगेश वानखेडे या गावठी दारु विक्रेत्याला अटक झाली होती. या प्रकरणात आरोपी योगेश वानखेडे याने मिथेनॉल मिक्स केलेली हातभट्टीची दारु हडपसर, गोखलेनगर, दापोडी आणि फुगेनगर या ठिकाणी विक्रीसाठी दिली होती अशी माहिती उघडकीस आली आहे.मिथेनॉल मिश्रित 840 लिटर दारू योगेश वानखेडेने बनवली होती.
यापैकी 200 च्या अंदाजे लिटर दारूची विक्री झाली होती अशी धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. हडपसर येथून पोलिसांनी 70 लिटर विषारी दारु जप्त केली. गोखलेनगर येथील विक्री न झालेली 420 लिटर दारु जप्त केली आहे. तर दापोडी आणि फुगेवाडी येथून 155 लिटर दारु जप्त करण्यात आली आहे.
मिथेनॉलला इथेनॉल समजला अन्…
योगेश वानखेडे याला हातभट्टीमध्ये इथेनॉल मिक्स करायचे होते, इथेनॉलपासून दारू बनवली जाऊ शकते ही माहिती त्याने ऑनलाईन शिकली होती, मात्र,इथेनॉल आणि मिथेनॉल यातील फरक न समजल्यामुळे योगेश वानखेडे याने हातभट्टीमध्ये मिथेनॉल मिक्स केल्याची तपासात माहिती समोर आली आहे. त्यामुळे योगेश वानखेडे याच्या चुकीचा फटका बसून १३ हून अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागल्याचे उघड झाले आहे.
इनपुट मिळाल्यानंतर सगळ्या अधिकाऱ्यांनी दापोडी जाऊन घटनास्थळी भेट दिली आहे.पोलीस विभागासोबत उत्पादन शुल्क विभागाने मुख्य आरोपींना अटक केली आहे. हातभट्टी दारू तयार करणारा आणि वाहतूक आणि वितरित करणारा या दोघांनाही अटक झाली आहे.दोन पथकांनी तांत्रिक तपास केल्यानंतर अटक झाली आहे. आरोपींनी तीन ठिकाणी दारूचे वितरण केले होते.
वानखेडे याच्यावर तीन जुने गुन्हे दाखल
आकाश जाधव, आर्यन धोत्रे आणि इरफान कुरेशी यांना दारुचे वितरण केले होते. आरोपी योगेश वानखेडे याच्यावर तीन जुने गुन्हे दाखल आहेत. प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचा प्रस्ताव पाठवला होता. पांढरस्थळ गावामध्ये त्याने हातभट्टीची दारू तयार करण्याचे काम केलं होतं आरोपीने पहिल्यांदाच मिथेनॉल मिक्स करण्याचा असा प्रयत्न केला होता असे उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांनी सांगितले.
उत्पादन शुल्क विभागाचे धाडसत्र
राज्य उत्पादन शुल्क विभागाने काल एका दिवसात 55 ठिकाणी हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या ठिकाणांवर कारवाई केली आहे. या कारवाईत 4480 लिटर हातभट्टी जप्त करून नष्ट करण्यात आली आहे. 42 हजार लिटर दारू बनवण्याचे रसायन जप्त करून नष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणी 55 आरोपींना राज्य उत्पादन शुल्क विभागाने अटक केली आहे. 24 लाख 12 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल देखील राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे.
विषारी दारूचा साठा जप्त केला आणि गुन्हे नोंद केले