Headlines

पुन्हा रणवीरच ठरला ‘धुरंधर’; इंडस्ट्रीतील बंदीबाबत फेडरेशनकडून मोठा निर्णय

पुन्हा रणवीरच ठरला ‘धुरंधर’; इंडस्ट्रीतील बंदीबाबत फेडरेशनकडून मोठा निर्णय
पुन्हा रणवीरच ठरला ‘धुरंधर’; इंडस्ट्रीतील बंदीबाबत फेडरेशनकडून मोठा निर्णय


अभिनेता रणवीर सिंहविरोधात जारी केलेले ‘नॉन कोऑपरेशन डायरेक्टिव्ह’ (असहकाराचे निर्देश) अखेर ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्लॉइज’ने (FWICE) अधिकृतपणे मागे घेतलं आहे. रणवीरने याविरोधात फेडरेशनला कायदेशीर नोटीस पाठवल्यानंतर हे निर्देश मागे घेण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर्स असोसिएशन (IMPPA), प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडिया (PGI) आणि सिने अँड टीव्ही आर्टिस्ट्स असोसिएशन (CINTAA) यांच्या हस्तक्षेपानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. ‘IMPAA, निर्मात्यांची संघटना आणि CINTAA यांच्या विनंतीनंतर आम्ही रणवीर सिंहविरोधात जारी केलेला असहकाराचा आदेश तात्काळ प्रभावाने मागे घेत आहोत’, असं FWICE चे अध्यक्ष बी. एन. तिवारी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

फेडरेशनची माघार

या प्रकरणात कोणीही जिंकलं किंवा कोणीही हरलं नाही. आमचा कायदेशीर विभाग रणवीरच्या नोटीसला उत्तर देईल, असंही तिवारी यांनी स्पष्ट केलं. ‘डॉन 3’ या चित्रपटातून अचानक माघार घेतल्यानंतर दिग्दर्शक-निर्माता फरहान अख्तर आणि त्याचा भागीदार रितेश सिधवानी यांनी फेडरेशनकडे तक्रार केली होती. त्यानंतर 25 मे रोजी रणवीरविरोधात असहकाराचा आदेश जारी करण्यात आला. यानंतर रणवीरच्या कायदेशीर टीमकडून फेडरेशनला नोटीस पाठवण्यात आली होती. याविषयी FWICE चे मुख्य सल्लागार अशोक पंडित यांनी सांगितलं, “काल आम्हाला कायदेशीर पत्र आलं आणि त्यात असहकाराचा आदेश मागे घेण्याची विनंती केली होती. आम्ही रणवीरला आवाहन करतो की त्याने आमच्यासोबत बसून तोडगा काढावा. आम्ही त्याच्या स्टारडमचा गौरव करतो. कोणावरही बंदी घालण्याचा अधिकार आम्हाला नाही. आम्हाला आशा आहे की रणवीरकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल.”

रणवीरला कलाकारांचा पाठिंबा

कंगना राणौत, राम गोपाल वर्मा, पद्मिनी कोल्हापुरे, पूनम ढिल्लो, निखिल द्विवेदी आणि संजय गुप्ता यांच्यासह अनेकांनी FWICE ने रणवीरवर केलेल्या कारवाईवर आपलं मत व्यक्त केलं होतं. तर काही दिवसांपूर्वी इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर्स असोसिएशनचे (IMPPA) माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ निर्माते टी. पी. अग्रवाल यांनी न्यायालयात याचिका दाखल करून फेडरेशनच्या निर्णयाला आव्हान दिलं होतं.

नेमकं प्रकरण काय?

2023 मध्ये फरहान अख्तर दिग्दर्शित ‘डॉन 3’ या चित्रपटाची अधिकृत घोषणा झाली होती. यामध्ये रणवीर सिंह मुख्य भूमिका साकारणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. मात्र ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर 2’ या चित्रपटांच्या प्रचंड यशानंतर रणवीर त्याच्या भूमिकांबद्दल अधिक सजग झाले. भूमिकेतील काही बदलांवरून त्याचे फरहानसोबत मतभेद झाले. अखेर शूटिंगच्या काही दिवस आधी त्याने चित्रपटातून माघार घेतली. मात्र यामुळे निर्मात्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं होतं. रणवीरने 45 कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी निर्मात्यांकडून करण्यात आली होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *