Headlines

गिरीश महाजनांनी गेमच फिरवला, नाशिकमध्ये मोठा फेरबदल; 24 तासात काय घडलं?

गिरीश महाजनांनी गेमच फिरवला, नाशिकमध्ये मोठा फेरबदल; 24 तासात काय घडलं?
गिरीश महाजनांनी गेमच फिरवला, नाशिकमध्ये मोठा फेरबदल; 24 तासात काय घडलं?


नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात निर्माण झालेला महायुतीचा तिढा अखेर सुटण्याच्या मार्गावर आहे. भाजपचे संकटमोचक आणि राज्याचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर भाजपचे बंडखोर उमेदवार गणेश गीते यांनी अखेर निवडणुकीतून माघार घेण्याची तयारी दर्शवली आहे. गेल्या २४ तासांपासून मुंबईत सुरू असलेल्या मॅरेथॉन बैठका आणि चर्चेनंतर हा निर्णय झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. परंतु, महायुतीचा हा आनंद तात्पुरता ठरण्याची शक्यता आहे. कारण गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते हे अजूनही निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. त्यामुळे गणेश गीते माघार घेणार असले, तरी त्यांचे बंधू अपक्ष म्हणून रिंगणात राहिल्यास महायुतीची डोकेदुखी कायम राहण्याची चिन्हे आहेत.

मुंबईत २४ तास हायव्होल्टेज ड्रामा; निलेश बोरांचा पुढाकार

नाशिक भाजपमधील या अंतर्गत बंडखोरीमुळे महायुतीचे अधिकृत उमेदवार यांच्या अडचणी कमालीच्या वाढल्याचे पाहायला मिळत आहे. हा वाद थेट मुंबई दरबारी पोहोचल्यानेगिरीश महाजन यांनी स्वतः यात लक्ष घातले. कालपासूनच गणेश गीते आणि गिरीश महाजन यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे नाशिकमधील नेते निलेश बोरा हे मुंबईत तळ ठोकून होते. त्यातच आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील गुप्त ठिकाणी गिरीश महाजन, निलेश बोरा आणि गणेश गीते यांच्यात दीर्घ चर्चा झाली. या बैठकीत गिरीश महाजन यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच गणेश गीते यांना येत्या काळात तुमचे योग्य राजकीय पुनर्वसन करु, असे आश्वासन दिल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर आता गिरीश महाजन यांच्या शब्दाचा मान राखत अखेर गणेश गीते यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास संमती दिली.

भावा-भावांमध्ये मतभेद? गोकुळ गीते निवडणूक लढण्यावर ठाम

एकीकडे गणेश गीते यांनी नमते घेतले असले, तरी त्यांचे लहान भाऊ गोकुळ गीते यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. गोकुळ गीते हे गेल्या अनेक महिन्यांपासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारांच्या संपर्कात आहेत. त्यांनी या निवडणुकीची मोठी तयारी केली आहे. कोणत्याही परिस्थितीत माघार नाही, अशी भूमिका गोकुळ गीते यांनी घेतल्याचे बोललं जात आहे. आता गणेश गीते हे स्वतः मुंबईहून नाशिकला परतल्यानंतर आपल्या भावाची समजूत काढणार आहेत. घरचा प्रश्न घरीच सोडवू आणि भावाची समजूत काढू, असा विश्वास गणेश गीते यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना दिल्याची माहिती आहे.

महायुतीसमोरील आव्हाने आणि पुढील चित्र

विधानपरिषदेसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर गोकुळ गीतेंनी माघार घेतली तर महायुतीचे अधिकृत उमेदवार यांच्या विजयाचा मार्ग सुकर होईल आणि भाजपची बंडखोरी पूर्णपणे शमल्याचे स्पष्ट होईल. तर गणेश गीते जरी बाजूला झाले, तरी गोकुळ गीते रिंगणात राहिल्याने भाजप आणि महायुतीच्या मतांमध्ये फूट पडण्याची भीती कायम राहील. याचा थेट फटका महायुतीला बसू शकतो. त्यामुळे आता गणेश गीते आपल्या भावाची मनधरणी करण्यात यशस्वी ठरतात का, आणि गोकुळ गीते निवडणुकीतून माघार घेतात का, याकडे संपूर्ण नाशिक जिल्ह्याचे आणि राजकीय विश्वाचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *