
शेतकरी कर्जमाफी योजनेमुळे खरंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला पाहिजे. पण महाराष्ट्र सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेवरुन वाद वाढत चालला आहे. याचं मुख्य कारण आहे, सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळणार नाहीय. महायुती सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली आहे. या योजनेसाठी जवळपास 36 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पण या योजनेत काही अटी सुद्धा घालण्यात आल्या आहेत. ज्याचा राज्यातील 12 लाख 71 हजार शेतकऱ्यांना फटका बसेल असा अंदाज आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या या शेतकरी कर्जमाफी योजनेवरुन वातावरण तापत चाललं आहे. आता शरद पवार पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी एक्सवरुन पोस्ट करुन इशारा दिला आहे.
मंत्रिमंडळ बैठकीची एक नोट बाहेर आली आहे. या नोटमधला मजकूर रोहित पवार यांनी पोस्ट केला आहे. “मंत्रिमंडळ बैठकीच्या नोटमध्ये स्वतः सरकारच सांगत आहे की ‘अटी-शर्ती टाकल्याने कर्जमाफीसाठी कमीत कमी निधी लागेल’, हा आहे या फसव्या सरकारचा फसवा चेहरा ! आहे” अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे. “हा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांना सर्वात आधी हाणले पाहिजे, शेतकऱ्यांप्रती संवेदना नसणारे अधिकारी सरकारमध्ये असले तरी काही प्रमाणात शेतकरीपुत्र देखील आहेत, ही नोट बाहेर आणणाऱ्या अधिकाऱ्याचे सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आभार…!” असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
शेतकऱ्यांशी चुकूनही दगाफटका करू नका
“मंत्रिमंडळ बैठकीत ही नोट मांडली गेली असताना एकाही मंत्र्याने तोंड उघडले नाही, सर्व मूग गिळून गप्प बसले याच दुःख आहे, कदाचित या योजनेतून टक्केवारीचा मालिदा मिळणार नाही म्हणून गप्प बसले असावेत” असा आरोप रोहित पवार यांनी केला. “सरकारने स्वतःची चूक दुरुस्त करून कर्जमाफीच्या अटी-शर्ती काढाव्यात, शेतकऱ्यांशी चुकूनही दगाफटका करू नये ही विनंती ! सरकार करत असलेल्या या दगाफटक्यातून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी, रक्षणासाठी, #अन्नदात्यासाठी_अन्नत्याग….!” असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे. ही शेतकरी कर्जमाफी योजना स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता संपल्यावर लागू होईल.