
राज्यसभा उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील नेत्यांची उपस्थिती आणि त्यावेळी घडलेल्या राजकीय घडामोडींनी पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राज्यसभा उमेदवार राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना केलेल्या एका मिश्किल वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
राजेंद्र जैन यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महायुतीतील अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेदरम्यान शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि आमदार भरत गोगावले यांची उपस्थिती पाहून छगन भुजबळ यांनी हलक्याफुलक्या शैलीत प्रतिक्रिया दिली.
“भरत गोगावले हे तटकरे यांचा तट तोडून आले आहेत,” असे मिश्किल वक्तव्य भुजबळ यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. मात्र, या विधानाचे राजकीय अर्थही काढले जाऊ लागले असून, महायुतीतील अंतर्गत समीकरणांबाबत चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.
दरम्यान, राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील विविध नेत्यांच्या भेटीगाठी आणि राजकीय हालचाली वाढल्या आहेत. अशातच छगन भुजबळ यांच्या या मिश्किल टिप्पणीने राजकीय वातावरणात हलकीशी रंगत निर्माण केली आहे. त्यांच्या या वक्तव्यामागे केवळ विनोद होता की त्यातून काही राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला, याबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू झाली आहे.