
मोबाईल आणि कपड्यांचे आमिष दाखवून एका १६ वर्षीय अल्पवयीन आदिवासी मुलीचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे या मुलीची लाखो रुपयांना विक्री करत जबरदस्तीने बालविवाह लावून दिल्याचा धक्कादायक प्रकारही नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी हरसूल पोलिसांनी ऑपरेशन शोध अंतर्गत अत्यंत धडक कारवाई केली आहे. हरसूल पोलिसांनी आंतरजिल्हा मानवी तस्करी आणि बालविवाह रॅकेटचा मोठा भांडाफोड केला असून, टोळीतील १० संशयित आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, हरसूल परिसरातील एका आदिवासी गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी, जिची आई हयात नाही, ती अचानक बेपत्ता झाली होती. मुलगी घरातून गायब झाल्याने तिच्या वडिलांनी हरसूल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखून नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. यानंतर हरसूल पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मुलीचा शोध सुरू केला.
यावेळी तपासादरम्यान पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. या मुलीला मोबाईल आणि चांगल्या कपड्यांचे आमिष दाखवून फूस लावून पळवून नेण्यात आले होते. पुढे तपासाची पाळेमुळे खोदली असता विवाहासाठी अल्पवयीन मुलींची खरेदी-विक्री करणारी एक मोठी आंतरजिल्हा टोळीच सक्रिय असल्याचे समोर आले. या टोळीने विवाहाच्या बहाण्याने मुलीची विक्री करून लाखो रुपये उकळल्याचा आरोप आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये ५ जण नाशिक जिल्ह्यातील तर ५ जण अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. हे आरोपी संगमनेर, गंगाम्हाळुंगी, पेठ आणि लातूर परिसरातील असल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास हरसूल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे करत आहेत. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून बालविवाह आणि मानवी तस्करीच्या या मोठ्या नेटवर्कचे धागेदोरे आणखी कुठपर्यंत पसरले आहेत, याचा शोध पोलीस घेत आहेत. आम्हाला ही तक्रार दाखल झाल्यानंतर आम्ही तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे मुलीचा शोध घेतला. तपासात हे केवळ अपहरणाचे प्रकरण नसून मुलींची खरेदी-विक्री करून बालविवाह लावणाऱ्या आंतरजिल्हा रॅकेटचा भाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. आम्ही १० आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे, असे हरसूल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांनी सांगितले.