
वुमन्स टीम इंडियाने अपेक्षेप्रमाणे आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 मोहिमेची सुरुवात विजयाने करण्यात यश मिळवलं आहे. भारतीय महिला संघाने या स्पर्धेतील सहाव्या आणि आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानवर एकतर्फी विजय मिळवला. भारताने पाकिस्तानला 64 धावांनी लोळवलं. भारतीय गोलंदाजांनी 171 धावांचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानला 17 ओव्हरमध्ये 106 रन्सवर ढेर केलं. दीप्ती शर्मा हीने बॉलिंगने टीम इंडियाच्या विजयात सर्वाधिक योगदान दिलं. दीप्तीने पाकिस्तान विरुद्ध 5 विकेट्स मिळवल्या. दीप्तीची टी 20i क्रिकेटमध्ये 5 विकेट्स घेण्याची ही दुसरी वेळ ठरली. दीप्तीने यासह मोठा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला आहे. दीप्ती टी 20i क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारी पहिली महिला गोलंदाज ठरली आहे.
दीप्तीचा पाकिस्तानला ‘पंच’
दीप्तीने पाकिस्तान विरुद्ध 4 ओव्हर बॉलिंग केली. दीप्तीने या 24 बॉलपैकी 14 बॉल डॉट टाकले. तर दीप्तीने 10 चेंडूत अवघ्या 10 देऊन 5 विकेट्स मिळवल्या. दीप्ती यासह टीम इंडियाच्या रेणुका सिंह आणि प्रियंका रॉय या दोघींना मागे टाकलं. दीप्ती शर्मा या दोघींच्या तुलनेत कमी धावा देणारी भारतीय गोलंदाज ठरली. रेणुकाने 2023 साली इंग्लंड 15 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स मिळवल्या होत्या. तर प्रियंका रॉय हीने 2009 साली 16 रन्स देत 5 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला होता.
दीप्ती शर्माची ऐतिहासिक कामगिरी, वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक
दीप्तीने 5 विकेट्स घेण्यासह टी 20i क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली. दीप्ती थायलँडच्या पुथावोंग हीला मागे टाकत टी 20i मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारी गोलंदाज ठरली आहे. दीप्तीने 145 टी 20i सामन्यांमध्ये 166 विकेट्स मिळवल्या आहेत. तसेच दीप्तीने आणखी एक खास कामगिरी केली आहे. दीप्ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 350 विकेट्स मिळवणारी पहिली फिरकीपटू ठरली आहे.
दीप्तीची दमदार कामगिरी
दरम्यान दीप्तीने 12 धावा करण्यासह 5 विकेट्स मिळवल्या. दीप्तीला या कामगिरीसाठी प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कारने सन्मानित करण्यात आलं. दीप्ती यासह टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियासाठी potm पुरस्कार जिंकण्याबाबत तिसऱ्या स्थानी पोहचली आहे. दीप्तीची हा पुरस्कार जिंकण्याची दुसरी वेळ ठरली आहे. माजी कर्णधार मिताली राज हीने 3 वेळा पुरस्कार जिंकला होता. तर भारतासाठी सर्वाधिक 4 वेळा हा पुरस्कार जिंकण्याचा विक्रम हा हरमनप्रीत कौर हीच्या नावावर आहे.