
राज्यात सध्या चर्चेत असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांदरम्यान सरनाईक यांनी पक्षप्रवेशाबाबत खुली भूमिका मांडली.
माध्यमांशी संवाद साधताना प्रताप सरनाईक म्हणाले की, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर विश्वास ठेवणाऱ्या कोणत्याही कार्यकर्त्यांसाठी, शिवसैनिकांसाठी, नगरसेवक, महापौर, आमदार आणि खासदारांसाठी आमच्या पक्षाचे दरवाजे 24 तास, वर्षाचे 365 दिवस खुले आहेत.”
यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीचेही कौतुक केले. “आजही एकनाथ शिंदे रात्री उशिरापर्यंत काम करतात. त्यांच्या काम करण्याच्या शैलीवर विश्वास ठेवून कोणाला पक्षात प्रवेश करायचा असेल तर आम्ही त्यांचे स्वागत करण्यास तयार आहोत,” असे सरनाईक यांनी सांगितले.
दरम्यान, ठाकरे गटातील किती खासदार शिंदे गटाच्या संपर्कात आहेत, या प्रश्नावर बोलताना सरनाईक यांनी स्पष्ट माहिती नसल्याचे सांगितले. मात्र, “प्रत्येक खासदाराच्या मतदारसंघाचा विकास व्हावा, अशी आमची भूमिका आहे. ज्यांना बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्याची इच्छा आहे आणि ज्यांचा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे, त्यांचे पक्षात स्वागतच आहे,” असे ते म्हणाले.
राज्यात ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना उधाण आले असताना सरनाईक यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. आगामी काळात ठाकरे गटातील काही नेते किंवा खासदार शिंदे गटात प्रवेश करणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.