
भारतीय चित्रपटसृष्टीतील सुरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे ‘आएगा आनेवाला’ हे गाणे आजही प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करते. 1949 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'महल' या चित्रपटातील हे गाणं केवळ सुपरहिट ठरले नाही तर याच गाण्यामुळे लता मंगेशकर यांना देशभरात मोठी ओळख मिळाली.
हे गाणे अभिनेत्री मधुबाला यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. संगीतकार खेमचंद प्रकाश यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याचे बोल नख्शब जार्चवी यांनी लिहिले होते.
या गाण्याशी संबंधित एक विशेष बाब म्हणजे, त्या काळात पार्श्वगायकांना फारसे महत्त्व दिले जात नव्हते. त्यामुळे गाण्याची रेकॉर्ड प्रसिद्ध झाली तेव्हा त्यावर लता मंगेशकर यांचे नाव न छापता चित्रपटातील ‘कामिनी’ या पात्राचे नाव छापण्यात आले होते.
मात्र, गाणे प्रचंड लोकप्रिय झाल्यानंतर रेडिओ केंद्रांवर श्रोत्यांचे फोन येऊ लागले आणि ही जादुई आवाज नेमका कोणाचा आहे, अशी विचारणा होऊ लागली. त्यानंतर प्रथमच लता मंगेशकर यांचे नाव मोठ्या प्रमाणावर चर्चेत आले.
‘आएगा आनेवाला’ या गाण्याने तीन मोठ्या कलाकारांच्या कारकिर्दीला नवे वळण दिले. ‘महल’ चित्रपटामुळे मधुबाला यांना स्टारडम मिळाले, दिग्दर्शक कमल अमरोही यांना नवी ओळख मिळाली आणि लता मंगेशकर हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रभावशाली गायिका बनण्याच्या प्रवासाला सुरुवात झाली.