
ठाकरे गटाचे सहा खासदार फुटले आहेत. संजय राऊत यांच्या बोलण्यामुळेच हे खासदार फुटले आहेत. उद्या ठाकरे गटाचे नगरसेवकही फुटतील, असा दावा भाजप नेते गिरीश महाजन यांनी केला होता. महाजन यांचं हे विधान ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना चांगलंच झोंबलं होतं. त्यामुळे संजय राऊत यांनी थेट गिरीश महाजन यांच्यावरच हल्ला चढवला. फक्त अर्धा तास ईडी आणि सीबीआय माझ्या हातात द्या, भाजपचे सात तुकडे होतील आणि सर्वात आधी गिरीश महाजन भाजपमधून फुटतील असा दावाच संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी आज मीडियाशी संवाद साधताना पुन्हा एकदा गिरीश महाजन यांच्यावर हल्ला चढवला आहे. मी कालच सांगितलं, माझ्या पक्षाच्यावतीने सांगतो, अर्धा तास फक्त ईडी सीबीआय मिळू द्या. भाजपचे महाराष्ट्रात सात तुकडे होतील, सर्वात आधी पक्ष सोडणाऱ्यांमध्ये गिरीश महाजन असतील. एवढ्या भानगडी गिरीश महाजन यांच्या आहेत, असं संजय राऊत म्हणाले.
संजय पाटलांनी तारे तोडू नये
यावेळी त्यांनी खासदार संजय दिना पाटील यांच्यावरही टीका केली. संजय दिना पाटील हे शिवसेनेमुळेच जिंकले. त्यांच्या मुलीला महापालिकेचं तिकीट दिलं. निष्ठावंत कार्यकर्त्याला डावलून आम्ही त्यांच्या मुलीला तिकीट दिलं. मुलगी शिवसेनेत आहे. वडिलांचं काय ते विचारा? वडील काल का नाही आले? संजय दिना पाटील यांची काल आम्ही दिल्लीत वाट पाहत होतो. ते येतील याची खात्री होती. त्यांना यावं असं का वाटलं नाही? पक्ष संकटातून जात असताना, आपलं कर्तव्य बजावावं असं ज्यांना वाटलं नाही, त्यांनी कशाला तारे तोडावे, असा हल्लाच राऊत यांनी चढवला.
तुमच्या बापाचं नाव काय?
खासदारांना तुडवण्याची कुणाच्या बापात हिंमत नाही, असं आमदार किशोर पाटील यांनी म्हटलं होतं. यावेळी राऊत यांनी किशोर पाटलांचा खरपूस समाचार घेतला. किशोर पाटीलला म्हणा तुमच्या असली बापाचं नाव काय आहे? आमच्या बापाचं नाव बाळासाहेब ठाकरे आहे. तुमच्या बापाचं नाव सांगू शकता का? हे विकलेले लोक आहेत. पैशासाठी पागल झाले. गांजा पिणारे लोक आहेत. नशा करणारे लोक आहेत. यांच्याकडे लॉयलटी नाही आहे. हे कशाला बोलतात? किशोर पाटीलला मी ओळखत नाही. तो माणूस कोण आहे? असा सवाल त्यांनी केला.