
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील जानेफळ येथे एका स्वीटमार्टमधील धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा मैदा एका तरुणाकडून पायाने तुडवला जात असल्याचे दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित स्वीटमार्टमध्ये मिठाई आणि इतर खाद्यपदार्थांच्या निर्मितीसाठी वापरला जाणारा मैदा स्वच्छतेचे नियम डावलून पायाने मळला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत असून, अन्नसुरक्षेच्या मुद्द्यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
या घटनेनंतर संबंधित आस्थापनाविरोधात कारवाईची मागणी होत आहे. अन्न आणि औषध प्रशासन (FDA) या प्रकरणाची दखल घेऊन तपास करणार का, तसेच संबंधितांवर कोणती कारवाई केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून, खाद्यपदार्थांच्या निर्मितीमध्ये स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोर पालन होणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.